नवी दिल्ली : इंडियन एअरलाइन्सच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांना उड्डाणबंदी करण्यात आली असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक सचिव पी.एस. खरोला यांनी बुधवारी दिली. गुरुवार हा ‘आव्हानात्मक’ दिवस असेल असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

या विमानावरील बंदी उठवणे निरनिराळ्या यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहील आणि हे लगेचच घडणार नाही, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख बी. एस. भुल्लर यांनी सांगितले. या विमानांच्या उड्डाणबंदीचा निर्णय डीजीसीएने मंगळवारी रात्री जाहीर केला.

स्पाइसजेटच्या ताफ्यात बोईंग ७३७ मॅक्स ८ प्रकारची १२ विमाने आणि जेट एअरवेजच्या ताभ्यात ५ विमाने असून, त्यांचे उड्डाण आधीच थांबवण्यात आले आहे.

स्पाइसजेट त्याच्या बहुतांश प्रवाशांना त्यांच्या इतर विमानांमध्ये सामावून घेणार असून, गरज भासल्यास इतर कंपन्याही तसेच करतील असे खरोला म्हणाले.

इथिओपियन एअरलाइन्सचे एक बोइंग ७३७ मॅक्स ८ आदिस अबाबाजवळ कोसळून चार भारतीयांसह १५७ लोक ठार झाल्यानंतर काही दिवसांतच या विमानाच्या उड्डाणावर बंदी घालण्याचा निर्णय गेण्यात आला आहे.