News Flash

अमेरिकेने बोईंगला दिली घातक F-15EX फायटर विमानं भारताला विकण्याची परवानगी

F-15EX मध्ये F-35 या स्टेल्थ फायटर जेटपेक्षाही जास्त मिसाइल्स वाहून नेण्याची ची क्षमता....

बोईंग कंपनीला भारताला F-15EX फायटर विमान विकण्याची परवानगी मिळाली आहे. अमेरिकन सरकारकडून आम्हाला F-15EX फायटर विमान इंडियन एअर फोर्सला विकण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती बोईंगकडून गुरुवारी देण्यात आली. बोईंग ही अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने बनवलेल्या काही विमानांचा भारतीय सैन्य दलांमध्ये वापर सुरु आहे.

“F-15EX च्या रुपाने IAF ला सुसज्ज आणि बहुउद्देशीय फायटर विमान मिळेल. शस्त्रास्त्र वाहून नेणं आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे विमान अद्वितीय आहे” असे अंकुर कांगलेकर म्हणाले. ते बोईंग डिफेन्स अँड स्पेस इन इंडिया फायटर सेल्सचे प्रमुख आहेत. “F-15EX विमानांसाठी बोईंगला अमेरिकन सरकारकडून मार्केटिंगचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे भारताला विमानांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

F-15EX हे नवीन बदल असलेले अत्याधुनिक फायटर विमान आहे. हे बहुउद्देशीय फायटर विमान सर्व प्रकारच्या वातावरणात तसेच दिवसा-रात्री मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे” असे अंकुर कांगलेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

भारत आणि अमेरिकेमध्ये मध्यंतरी ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘BECA’ करार झाला होता. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

किती घातक आहे F-15EX विमान?
मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय एकाचवेळी वेगवेगळी काम करु शकणारं फायटर विमान. F-15E ही F-15 विमानाची पुढची आवृत्ती आहे. १९७२ साली F-15 फायटर विमानाने पहिले उड्डाण केले होते. F-15E आणि F-15 ही दोन्ही विमाने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या हवाई दलाच्या ताफ्यात अजूनही आहेत. सौदी अरेबिया आणि कतार या आखातामधील दोन देशांकडे F-15EX विमाने आहेत. “या वर्गातील कुठल्याही फायटर विमानांपेक्षा F-15EX विमानांचा पल्ला आणि जास्त पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे” असे बोईंगकडून सांगण्यात आले.

F-15EX मध्ये ३६ टनापर्यंत वजन उचलून उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारताचे मुख्य अस्त्र सुखोई-३० एमकेआयमध्ये सुद्धा इतकीच क्षमता आहे. बोईंगच्या दाव्यानुसार F-15EX १३ टनापर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते. या विमानातील अत्याधुनिक दिशादर्शक प्रणालीमुळ जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो. F-15EX मध्ये हवेतून हवेत हल्ला करणारी २२ मिसाइल्स डागण्याची क्षमता आहे. F-15EX मध्ये F-35 या स्टेल्थ फायटर जेटपेक्षाही जास्त मिसाइल्स वाहून नेण्याची ची क्षमता आहे.

मागच्यावर्षीच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन एअर फोर्ससाठी आठ F-15EX विमाने खरेदी करायला मंजुरी दिली. इस्रायल, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या देशांकडे F-15E विमाने आहेत. महत्त्वाच म्हणजे दक्षिण कोरिया आणि सिंगापूरने राफेलऐवजी F-15E च्या खरेदीला पसंती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 4:48 pm

Web Title: boeing gets permission from us government to offer f 15ex jet to india dmp 82
Next Stories
1 शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर; पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन
2 अदर पुनावाला यांनी दिली ‘गुड न्यूज’; जूनपर्यंत ‘सीरम’ आणणार आणखी एक लस
3 करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर होतो परिणाम; प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती
Just Now!
X