ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यामधील दलाल ख्रिश्चिअन मिशेलला बुधवारी दिल्लीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयला मिशेलकडून मोठे खुलासे होण्याची आशा आहे. दरम्यान, मिशेलची चौकशी ही चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे एकदाचे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल कायदा आपलं काम करेन, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.


ब्रिटिश नागरिक असलेला ख्रिश्चिअन मिशेल ३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात दलाल होता. त्याला मंगळवारी रात्री उशीरा दुबईमधून भारतात आणण्यात आले. बुधवारी त्याला सीबीआयचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी मिशेलच्या वकिलांनी कोर्टाकडे त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र, सीबीआयने सीबीआय कोठडीची मागणी केली.

सीबीआयने कोर्टात म्हटले की, मिशेलच्या चौकशीत आम्ही या व्यवहाराच्या एकूण रकमेची माहिती मिळवू इच्छित आहोत. दरम्यान, मिशेलकडून जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला. मात्र, त्यावर सुनावणी झाली नाही.