तामिळनाडूत एका केमिकल फॅक्टरीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला असून यात ६ कामगार जागीच ठार झाले आहेत, तर १७ गंभीर जखमी झाले आहेत. कुड्डालोर जिल्ह्यातील नेयवेली लिग्नाईट प्लांटमध्ये (दगडी कोळसा प्रकल्प) बुधवारी ही दुर्घटना घडली. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रकल्प तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

गेल्या तीन महिन्यांत या प्रकल्पामध्ये झालेला हा दुसरा मोठा स्फोट आहे. या आधी घडलेल्या स्फोटात आठ कामगार जखमी झाले होते. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी (सोमवारी) रात्री आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला होता तर चार जण आजारी पडले होते. परवाडा फार्मा सिटीतील ‘सायनॉर लाईफ सायन्सेस’ या केमिकल कंपनीत बेंझिमायडाझोल नामक वायूची गळती झाली होती. न्यूज १८ ने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, विशाखापट्टणम जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यातील हा दुसरा अपघात असून ७ मे रोजी LG Polymers केमिकल प्लांटमध्ये मोठी वायू गळती झाली होती. यामध्ये १२ लोक आणि अनेक गुरं मृत्यूमुखी पडली होती. अशीच एक वायू गळतीची घटना छत्तीसगडमधील रायगड येथील पेपर मीलमध्ये घडली होती. तसेच नेयवेली येथेही एका बॉयलचा स्फोट झाला होता. दरम्यान, पुण्यातही २२ मे रोजी एका केमिकल फॅक्टरीमध्ये मोठी आग लागली होती.

केंद्र सरकारने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनदरम्यान या घटना घडल्या होत्या.