दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल विभागानं इन्स्टाग्रामवरील बॉईस लॉकर रुम या ग्रुपच्या अ‍ॅडमिनला बुधवारी अटक केली आहे. दरम्यान, या ग्रुपचा अ‍ॅडमिन हा १२ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी असून तो अल्पवयीन नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या विद्यार्थ्यानं यावर्षी १२ वीच्या परीक्षांची तयारीही केली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ४ मे रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला होता आणि याचा तपास सायबर प्रिव्हेंशन अवेयरनेस अँड डिटेक्शन (CyPAD) युनिटकडे वर्ग करण्यात आला होता.

अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं या ग्रुपमधील अन्य विद्यार्थ्यांची नावेही पोलिसांना सांगितली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. अल्पवयीन मुलींचे फोटो शेअर करणं तसंच आक्षेपार्ह गोष्टींबद्दल चॅटिंग करण्यासारखे आरोप या सर्वांवर करण्यात आले आहेत. इंडिय टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यापूर्वी पोलिसांनी या ग्रुपमधील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशीही केली होती. त्यानंतर त्या ग्रुपमधील इतर सदस्यांची ओळख पटली होती. सध्या या ग्रुपमधील २७ जणांची ओळख पटली असून मंगळवारपर्यंत त्यांच्यापैकी १५ जणांना चौकशीसासाठी बोलावण्यात आलं होतं.

दरम्यान, सायबर प्रिव्हेंशन अवेयरनेस अँड डिटेक्शन (CyPAD) युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन कथित ग्रुप आणि त्यातील सदस्यांविषयी माहिती मागितली आहे. इन्ट्राग्रामकडून अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. या ग्रुपमधील सदस्यांकडे असलेले मोबाइल सध्या ताब्यात घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

‘बॉईस लॉकर रूम’ प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागानं केलेल्या प्राथमिक चौकशीत इन्स्टाग्राम चॅट ग्रुपमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचंही उघड झालं आहे. यापैकी दहा विद्यार्थी हे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली असून असेच काही आणखीही ग्रुप सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी इन्स्टाग्रामकडून या ग्रुपमधील सर्व सदस्यांबद्दल माहिती मागवली आहे. “या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांची ओळख पटवली जात आहे. या ग्रुपमधील अल्पवयीन सदस्यांवर ज्युविनाईल जस्टिस अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे, ”असे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. एका मुलीनं या ग्रुपमधील काही स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर ही माहिती उघड झाली होती.