नायजेरियात बोकोहरम या अतिरेकी संघटनेने मुलींचे अपहरण केल्यानंतर अजूनही तेथे त्यांच्या कारवाया ईशान्येकडे चालूच आहेत. त्यांनी बाजारपेठेत अग्निबाणांचा मारा केला. नायजेरियाने या भागात लष्कर पाठवले असून तेथे नियंत्रण मिऴवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
    नायजेरियन सैन्यामध्येही कुरबुरी असून बंडखोर सैनिकांनी बोकोहरामशी लढण्यासाठी आम्हाला चांगली शस्त्रास्त्रे दिलेली नाहीत, असा आरोप जनरल्सवर केला आहे. बोकोहरामच्या अतिरेक्यांनी एकाचे चिबोक येथून परतताना अपहरण करण्यात आले. दरम्यान बोको हरामने ज्या तीनशे मुलींचे अपहरण केले आहे त्यांच्या शोधासाठी अमेरिकेने ड्रोन विमाने यापूर्वीच पाठवली आहेत.
मेजर जनरल अहमद महंमद यांना जेव्हा आपले सैनिक मारले गेल्याचे समजले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची कुठलीही भावना दिसली नाही. एकदा तर एका खेडय़ात मुक्काम करावा लागणार होता तेव्हा जनरलने त्यांना रात्रीच्या रात्री दुसऱ्या मुक्कामी जाण्याचे फर्मावले. त्यामुळे बोको हरामकडून मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या वाढत असून आपल्याच बांधव सैनिकांचे मृतदेह शवागारात नेताना पाहून चुकीच्या धोरणांमुळे सैनिकांचे मनौधैर्य खचत आहे. काही सैनिकांनी संतप्त होऊन जनरलच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात जनरल जखमी झाला नाही.
लष्कराच्या प्रवक्याने सांगितले की, लष्कर बेशिस्त सैनिकांना शिस्त लावील व बंडखोरांविरूद्ध लढाईत त्याचा परिणाम होणार नाही. मेजर जनरल ख्रिस ओलुकोलाडे यांनी सांगितले की, बोको हरामविरोधातील लढाई जोरात सुरू ठेवली जाईल. बोरनो येथील लष्करी मुख्यालयात व  मैदुगुरीतील बराकीत लष्कराचे बंड झाले व तेच बोको हराम विरोधातील लढाईचे केंद्र आहे. काही सैनिकांनी वेतन न मिळाल्याची तक्रार केली तर काहींनी पुरेसे पाणी व रक्षणासाठी वाळूची पोती, शस्त्रास्त्रे नसल्याची तक्रार केली.
 आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून बोको हरामचा पराभव करून मुलींना सोडवू व कुटुंबांच्या ताब्यात देऊ असे  नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी सांगितले.