चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांनी मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली.
“कुल्लूच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाली,” अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
सनी देओल यांनी मागील आठवड्यात मुंबईत आपल्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर पीटीआयच्या वृत्तानुसार ते कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये उपचार घेत होते. तर दुसरीकडे मंगळवारी गुजरातहून राज्यसभेवर नियुक्त केलेले खासदार अभय भारद्वाज यांचं चेन्नईत करोनामुळे निधन झालं. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. भारद्वाज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2020 8:02 am