भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा सामना रंगणार आहे. पण मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून टीका होत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनेही उडी घेतली आहे.

‘लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर. संभाव्य दहशतवादी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा. द्वेष आणि विभाजनाच्या अजेंड्याबाबत भाजपा अत्यंत नग्न आहे,’ अशा शब्दांत स्वराने भाजपावर हल्लाबोल केला.

स्वराच्या या ट्विटवर एका शिवसेना नेत्याने आक्षेप घेत तिला ‘कन्हैय्याची आई’ असं म्हटलं. ‘भारत तेरे तुकडे वाला चालतो पण एक निर्दोष महिला नाही चालत. स्वरा अजून किती खालच्या स्तरावर जाणार, ही तर हद्द झाली,’ अशी टीका त्याने केली. स्वराने कन्हैय्या कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा केला होता. यावरही स्वराने प्रत्युत्तर देत ट्विट केलं, ‘चाचाजी, मी कितीही खालच्या पातळीवर गेली तरी तुम्ही आणि तुमच्या संघवाद्यांच्या पातळीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ही महिला तुम्हाला निर्दोष वाटते- वाह! मग तर तुम्हाला हाफिज सईद संत वाटत असेल? माफ करा, तो तर मुस्लीम आहे.’

मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.