जेएनयू हिंसाचार आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात(सीएए) सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आधी मोदींनी त्यांच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र दाखवावे नंतर आमच्याकडे मागणी करावी”, अशा शब्दात अनुराग कश्यपने मोदींवर हल्लाबोल केलाय.

“आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोदींना म्हणावं पहिले तुमचे कागदपत्र, entire political science ची पदवी दाखवा. तसेच वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या हिंदुस्थानाला दाखवा, नंतर आमच्याकडे मागणी करा”, अशी टीका अनुराग कश्यपने ट्विटरद्वारे केली आहे. एवढ्यावरच न थांबता अन्य एका ट्विटमध्ये, ‘मोदींनी शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा’ असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.


देशात सुधारित नागरिकत्व कायदा शुक्रवारपासून लागू करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीएए विरोधात देशभरात हिंसक आंदोलनं झाली तसंच हा कायदा मागे घेण्यासंदर्भात मागणी अनेकदा करण्यात आली. पण अखेर मोदी सरकारने हा कायदा देशात लागू केला आहे. अनुराग कश्यप सातत्याने मोदी सरकारच्या नीति आणि धोरणांवर टीका करत असतो. पण, जामिया आणि जेएनयू प्रकरणानंतर आता अनुराग कश्यप मोदी सरकारवर अत्यंत आक्रमक टीका करताना दिसत आहे.