केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी सिंगर-अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यात सुरू असलेल्या ट्विटर वॉरचीही बरीच चर्चा आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजीबद्दल फेक ट्वीट केलं होतं. ही आज्जी १०० रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात जाते असं तिने ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र नंतर तिने हे ट्वीट डिलीट केलं. पण तिच्या फेक ट्विटचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे.

कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटवरुन दिलजीत दोसांजने कंगनाला धारेवर धरत तिला चांगलेच खडेबोल सुनावले. त्यानंतर आता बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग यानेही कंगनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ‘तुला लाज वाटायला हवी, तुझ्यात थोडेजरी शिष्टाचार असतील तर वृद्ध आज्जींची माफी माग’, असं मिका सिंगने म्हटलं आहे.

आणखी वाचा- #DiljitVsKangana: ‘कंगना को दिलजीत पेल रहा है’ विरुद्ध ‘कंगना रानौत शेरनी है’… मिम्समधून धम्माल टोलवाटोलवी

मिकाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दोन वृद्ध आज्जींचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्रीनशॉटही आहे. या ट्विटसोबत मिकाने, “माझ्या मनात कंगनासाठी खूप आदर होता…तिच्या ऑफिसची तोडफोड झाली तेव्हा तिच्या समर्थनार्थ मी ट्विटही केलं होतं. पण मला आता वाटतंय की मी चुकीचा होतो. स्वतः एक महिला असल्याने तू वृद्ध महिलेचा थोडातरी आदर ठेवायला हवा. तुला लाज वाटायला हवी..तुझ्यात थोडेजरी शिष्टाचार असतील तर माफी माग”, अशी संतप्त प्रतिक्रिया मिकाने दिली आहे.

आणखी वाचा- “भावा तूच खरा रॉकस्टार’”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

दरम्यान, कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ‘अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून वारंवार समाजात दुही व द्वेषभावना निर्माण करणारे, सामाजिक सौहार्दता व बंधुभाव बिघडण्यास चिथावणी देणारे, विशिष्ट धर्माची प्रतिमा मलीन करणारे ट्वीट केले जात आहेत. याविषयी ट्वीटर इन्कॉर्पोरेशन कंपनीकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कंगनाचे ट्वीटर अकाऊंट कायमचे स्थगित किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच ट्वीटर इन्कॉर्पोरेशनला आपल्याच नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत’, अशा विनंतीची याचिका अॅड.अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.