नाच-गाणी, रडारड, मेलोड्रामाचा पूर, लग्नकांड, सूडकांड अशी जरी हिंदी चित्रपट सृष्टीवर देशातील प्रेक्षकांकडूनच नेहमी टीका होत असली, तरी त्या टीकेला दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया नावाच्या राष्ट्रातील नागरिकांनी गप्प करून टाकले आहे. फुटबॉलसाठी प्रसिद्ध आणि अमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या राष्ट्रामध्ये कुटुंबमूल्य सांगणारे आणि नृत्यगीत असणारे भारतीय सिनेमे नीतीशिक्षक म्हणून लोकप्रिय बनू लागले आहेत. जगण्याचे नवे दिशादर्शक म्हणून या चित्रपटांकडे पाहिले जात असल्याचे ‘फ्रेण्ड्स ऑफ इंडिया असोसिएशन’च्या (अमिगोस दे इंडिया) संस्थापक क्लाऊडिया वेगा यांनी सांगितले. बोगोटा येथील या संस्थेद्वारे तेथील भारतीय दूतावासाच्या सौजन्याने भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून बॉलीवूड चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या कोलंबियामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स आणि स्थानिक मनोरंजन वाहिन्यांमधून भारतीय चित्रपटांचा प्रचार आणि प्रसार होत आहे. शिवाय अमिगोस दे इंडिया या संस्थेच्या वतीने बॉलीवूड गीतांवर नृत्याचे अनेक कार्यक्रम बसविले जातात. स्थानिक वाहिनीवर ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दीक्षित अभिनित ‘देवदास’ चित्रपट पाहिल्यानंतर भारतीय चित्रपटांच्या प्रेमात पडल्याचे क्लाऊडिया यांनी स्पष्ट केले.    
बॉलीवूडवर प्रेम का?
हिंदी चित्रपटांमध्ये प्रेमाच्या आनंददायी कथा असतात. या कथा दैनंदिन समस्यांपासून प्रेक्षकाला लांब नेण्यासोबत कुटुंबमूल्यांचा संस्कार करतात. हिंसाग्रस्त कोलंबियामध्ये म्हणूनच हे चित्रपट आवडीने पाहिले जात असल्याचे क्लाऊडिया म्हणाल्या. बॉलीवूड सिनेमा स्वीकारण्याबाबत सुरुवातीला कोलंबियन नागरिकांकडून आढेवेढे घेतले जात होते. मात्र जसजसे हे सिनेमे मोठय़ा प्रमाणात वाहिन्यांवरून दिसू लागले, तसे त्यातील कौटुंबिक मूल्यांनी कोलंबियातील आबालवृद्धांवर मोहिनी घातली. बॉलीवूडचे विश्व हे जादुई असून त्यात रोमान्स आणि संगीताचा भर असतो, असे कॅथरिन ख्रिस्टान्चो या मेडेलिन शहरातील नृत्यांगनेचे म्हणणे आहे. कॅथरिन स्वत: शाहीद कपूर, काजोल आणि राणी मुखर्जी यांची चाहती आहे.
बॉलीवूडचे वसाहतीकरण कसे?
बडय़ा बॅनरचे आणि ब्लॉकबस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपटांना परदेशी बाजारपेठ मोठी असते. अमेरिका, युरोप आणि संयुक्त अरब राष्ट्रांमध्ये हे पहिल्या धारेचे सिनेमे भारतासोबत प्रदर्शित होण्याचे प्रकार दरवर्षी वाढत आहेत. आफ्रिकेतील गरीब राष्ट्रांमध्ये आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारतीय मारधाडपटांची मोठय़ा प्रमाणावर निर्यात होते. स्वस्तात प्रिंट उपलब्ध होतात म्हणून गरीब आफ्रिकी राष्ट्रांत भारतीय चित्रपट दाखविले जातात. नायजेरियातील चित्रपटगृहांमध्ये हाणामारीच्या भारतीय सिनेमांना प्रेक्षकांची मोठी मागणी असते.