सोमवारी व मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमुळे इराण हादरले आहे. या स्फोटात ४२ जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. बगदादपासून ८० किलोमीटरवरील कार्बला या शहरात हे स्फोट झाले. या शहरातील बाजारात तसेच धार्मिक स्थळाजवळ हे स्फोट झाले, यात १० जण जागीच ठार झाले. कार्बला शहराला धार्मिकदृष्टय़ा महत्त्व असल्याने तेथे भाविकांची गर्दी होती. नव्याने स्फोट होऊन या गर्दीतील भाविक दहशतवादाला बळी पडू नयेत, यासाठी लगेचच सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. या स्फोटामागे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय गृह मंत्रालयाने व्यक्त केला आहे. इराणमध्ये गेल्या तीन महिन्यांत दहशतवादी कारवायांत मारले गेलेल्यांची संख्या दोन हजारावर पोहोचली आहे.