आग्नेय तुर्कस्तानमधील एका पोलीस ठाण्यासह नजीकच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर कुर्दिश बंडखोरांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात पाचजण ठार, तर ३९ लोक जखमी झाल्याची माहिती प्रांतिक सरकारने दिली.

कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या (पीकेके) हल्लेखोरांनी सिनार शहरात सर्वप्रथम केलेल्या कार बॉम्बहल्ल्यामुळे एक इमारत कोसळून झालेल्या जखमांमुळे तिघांना जीव गमवावा लागला, असे दियारबकिर प्रांतपालांच्या कार्यालयाने एका निवेदनात सांगितले. रात्री उशिरा झालेल्या या स्फोटामुळे पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबीय राहात असलेल्या इमारतींचे झालेले प्रचंड नुकसान दाखवणारी छायाचित्रे तुर्की प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली. या घरांची बाहेरील संपूर्ण भिंत स्फोटामुळे उडवली गेली.

या स्फोटात पोलीस व नागरिक दोघेही जखमी झाले असले, तरी प्राथमिक वृत्तानुसार ठार झालेले लोक नागरिक होते. या बॉम्बस्फोटात १४ जण, तर इमारत कोसळल्यामुळे २५ जण जखमी झाले आणि त्यात इमारतीच्या ढिगाऱ्यातून सुटका करण्यात आलेल्या पाचजणांचा समावेश असल्याचे प्रांतपालांच्या कार्यालयाने सांगितले.

कार बॉम्बहल्ल्यापाठोपाठ हल्लेखोरांनी क्षेपणास्त्रे डागली, तसेच दूरवरून गोळीबारही केला.

पीकेके पक्षाने तुर्कस्तान सरकारविरुद्ध १९८४ साली औपचारिक बंड पुकारले. कुर्दिश स्वातंत्र्याचा लढा म्हणून सुरुवात केल्यानंतर आता ते देशाच्या सर्वात मोठय़ा वांशिक अल्पसंख्याक गटासाठी अधिक स्वायत्तता आणि हक्क यांची मागणी करत आहेत.

या संघर्षांत आजवर हजारो लोक मारले गेले आहेत.