इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरातील एका वर्दळीच्या बाजारपेठेत गुरुवारी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात किमान २८ जण ठार, तर ७३ जण जखमी झाले.

देशात मुदतपूर्व निवडणुका घेण्याच्या निर्णयाबाबत, तसेच तीव्र अशा आर्थिक संकटाच्या मुद्दय़ावर राजकीय तणाव वाढला असताना, मध्य बगदादमधील बाब अल- शार्की या व्यावसायिक भागात हे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. या गर्दीच्या बाजारपेठेत कपडे व पादत्राणे यांच्या ढिगांसह फरशीवर ठिकठिकाणी रक्त विखुरले होते. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

मृतांची प्रत्यक्ष संख्या याहून अधिक असल्याचे रुग्णालय व पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी बगदादमधील सर्व रुग्णालयांना सज्ज करण्यात आल्याचे इराकच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. सुरक्षा दले दोन आत्मघातकी बॉम्बर्सचा पाठलाग करत असताना त्यांनी तायरान चौकानजीक बाजारपेठेत अंगावरील स्फोटके उडवून देऊन हा हल्ला केला.