पाकिस्तानातील लाहोर शहर बॉम्बस्फोटाने हादरले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तोबयाचा म्होरक्या हाफिज सईदच्या जोहार टाऊन भागातील घराबाहेर हा स्फोट झाला. अकबर चौकात झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लाहोर शहरातील जोहार टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी स्फोट झाला. लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या घरासमोर हा स्फोट झाला.  या भीषण स्फोटात १७ जण जखमी झाले आहेत.

एहसान मुमताज रुग्णालयाच्या जवळ असलेल्या ई ब्लॉकमध्ये स्फोट झाला. घटनेत जखमी झालेल्या सर्वांना जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास केला जात असून, मदत कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती लाहोरचे सीसीपीओ गुलाम महेमूद डोगर यांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dawn Today (@dawn.today)

सामा टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना लाहोरचे पोलीस उपायुक्त मुदसीर रियाज मलिक यांनी, “या घटनेत महिला आणि लहान मुलांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. घटनेचा तपास केल्यानंतर स्फोटाच्या कारणाविषयी सांगू शकू,” अशी माहिती दिली अगोदर दिली होती.

“गॅस पाईपलाईन फुटली की गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, याबद्दल अद्याप निश्चित काही सांगता येणार नाही. स्फोट कशामुळे झाला आहे, हे अजून समजू शकलेलं नाही. पण, चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती आहे,” अशी माहिती रेस्क्यू ११२२ च्या प्रवक्त्यांनी दिली.