स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनास अवघी काही मिनिटे असतानाच मणिपूरमध्ये गुरुवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मणिपूर रायफल्सच्या संचलन मैदानापासून अवघ्या ४०० मीटरवर असलेल्या मोईरांगखोम पेट्रोल पंपावर गुरुवारी सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी हा स्फोट घडवून आणण्यात आला. दरवर्षी मणिपूर रायफल्सच्या संचलन मैदानावरच स्वातंत्र्यदिनाचा मुख्य समारंभ होत असतो. गुरुवारी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार होते.
पेट्रोल पंपाजवळ रस्त्याकडेला घुसखोरांनी हा बॉम्ब पेरला होता. प्राथमिक तपासात त्याची तीव्रता कमी असल्याचे आढळले. मात्र, स्फोटाचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू आला, असे पोलिसांनी सांगितले. बॉम्बस्फोटानंतर ध्वजवंदनासाठी जमलेले राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी लगेचच घटनास्थळी गेले. परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात येऊन सर्वांची कसून तपासणी करण्यात येऊ लागली. बॉम्बस्फोटाच्या जागेपासून एक किलोमीटरवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि पोलिस मुख्यालय आहे.