‘राम जन्मभूमी’ नावाच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापासून युट्यूबला मुंबई हायकोर्टाने रोखले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माते वसीम रिज्वी यांना या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि अन्य सामग्रीला सोशल मीडिया आणि चित्रपटगृहांतून न दाखवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांचे वकील सईद काजी यांनी ही माहिती दिली.

राम जन्मभूमी हा चित्रपट राम मंदिर आणि बाबरी मशिदीवरुन सुरु असलेल्या वादाच्या प्रकरणावर आधारित आहे. याच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक दृश्यांना खूपच विरोध करण्यात आला आहे. यामध्ये कशा प्रकारे राजकारणाच्या नावावर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये आपापसात फूट पाडली  जात असून राजकीय नेते त्याचा फायदा घेत आहेत, हे दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सनोज मिश्रा यांनी केले आहे. तर वसीम रिझवी या चित्रपटाचे लेखक आणि निर्माते आहेत. या चित्रपटात मनोज जोशींनी महत्वाची भुमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, आता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात दंगली झाल्या होत्या. त्यानंतरपासून हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबरी पाडल्यानंतर झालेला गोळीबार, त्यामध्ये कार सेवकांचा झालेला मृत्यू, तीन तलाक तसेच हलालासहित अनेक बाबी दाखवण्यात आल्या आहेत.