अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया विरोधात दाखल केलेला विनयभंगाचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. २०१४ साली आयपीएल सामन्याच्यावेळी वानखेडे स्टेडियमवर दोघांमध्ये झालेल्या वादावादी नंतर प्रीतीने नेस विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

एफआयआर रद्द करण्यासाठी वाडिया यांनी याचिका दाखल केली होती. न्यायाधीश रणजीत मोरे आणि न्यायाधीश भारती एच दानग्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. त्यांनी प्रीती झिंटा आणि नेस वाडिया दोघांना बुधवारी निकालाच्या सुनावणीसाठी हजर रहाण्यास सांगितले होते.

याआधीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने प्रीती झिंटाला वाडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ३० मे २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांदरम्यान आयपीएलचा सामना सुरु होता. त्यावेळी आपल्याला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून नेस वाडियाने तिकीट वाटपावरून आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांच्या देखत शिवीगाळ केली.

त्यानंतर मी जागा बदलली. मात्र त्याने नेसचे समाधान झाले नाही. त्याने टीम सदस्यांच्या देखत पुन्हा आपल्याला शिवीगाळ करत असभ्य वर्तन केलं आणि हात जोरात खेचला असा आरोप प्रीती झिंटाने केला होता. तिने मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण सामोपचाराने मिटवा’ असं मत न्या. रणजीत मोरे यांनी व्यक्त केलं होतं.
जर नेस वाडिया माफी मागण्यास तयार असेल तर आपण केस मागे घेऊ असं अभिनेत्री प्रीती झिंटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. मात्र नेस वाडिया माफी मागणार नाहीत असं वाडियांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं.