सुमारे ३० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटींचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. बोनसची रक्कम दसऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

बोनसची रक्कम एकाच हप्त्यात दिली जाणार असून, सणासुदीच्या काळात नोकरदारांच्या हातात पैसे आल्याने त्यांना वस्तू खरेदीसाठी खर्चही करता येईल. त्यामुळे बाजारातील मागणी वाढून आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

करोनामुळे महसुलावर परिणाम झाला असून , आरोग्य सुविधांपोटी केंद्राला अतिरिक्त आर्थिक बोजाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, करोनामुळे आर्थिक व्यवहारांना चालना देण्याची गरज लक्षात घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनसचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे, टपाल खाते, संरक्षण, कर्मचारी निवृत्तीवेतन संघटना (ईपीएफओ) आदी व्यावसायिक विभागांमधील १६.९७ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. त्यासाठी २,७९१ कोटी रुपये खर्च होतील. तसेच बिगरराजपत्रित १३.७० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ होणार असून, त्यासाठी सरकारी तिजोरीवर ९४६ कोटींचा बोजा पडेल. एकूण ३०.६७ लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे.

क्रयशक्तीला चालना..

करोनाकाळात सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढविण्याचे केंद्राचे प्रयत्न आहेत. गेल्या आठवडय़ात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी नोकरदारांसाठी विशेष साह्य़ योजना घोषणा केली होती. त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना १० हजारांपर्यंत आगाऊ  रक्कम कर्जरूपात मिळू शकेल. प्रवास भत्त्यांचा वापर वस्तू खरेदीसाठी करण्याची मुभाही देण्यात आली. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘कॅश व्हाऊचर’ दिले जाणार आहेत. त्यापाठोपाठ केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बाजारात मागणी आणि आर्थिक उलाढाल वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.