राहुल यांच्या मुंबईभेटीत ‘संपर्क मोहिमे’ला सुरुवात

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज, मंगळवारी मुंबई दौऱ्यावर असून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. काँग्रेसने पहिल्यांदाच बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. भाजप सातत्याने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेत असल्याने त्याचाच कित्ता आता काँग्रेसने गिरवण्यास सुरुवात केली आहे. या पद्धतीने तळातील कार्यकर्त्यांशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष मानला जातो. या कार्यकर्त्यांना संघाच्या प्रचारकांचीही जोड मिळते. शिवाय, भाजपचे नेते विशेषत पक्षाध्यक्ष अमित शहा तळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. काँग्रेस मात्र नेत्यांचाच पक्ष असल्याचे मानले जाते. कार्यकर्त्यांचे भक्कम संघटन नसल्याने काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून आंदोलनेही जोरकस होत नाहीत असे दिसून आले आहे. मात्र, ‘आता काँग्रेसने पक्षातील हा कमकुवतपणा दूर करण्याचे ठरवले असून त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याला राहुल गांधी यांनी प्राधान्य दिले आहे,’ असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सांगितले.

काँग्रेसच्या या प्रयोगाला ‘शक्ती’ असे संबोधले गेले असून या माध्यमातून तळातील कार्यकर्ता थेट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधू शकतो. पक्ष संघटनेतीलच नव्हे तर स्थानिक स्तरावरील अडचणीही कार्यकर्त्यांला दिल्लीपर्यंत पोहोचवता येणार आहेत. कार्यकर्ता आणि नेते यांच्यामध्ये दुहेरी संवाद सुरू होऊन पक्ष बळकट होऊ शकतो, अशी शक्तीमागील संकल्पना आहे. त्याची सुरुवात राहुल गांधी मुंबई दौऱ्यात करणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा कथित आरोप करून भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला वर्ग केला आहे.

या प्रकरणाची सुनावणी आज, मंगळवारी होत असून राहुल गांधी भिवंडी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राहुल गांधी बुधवारी नागपूरला रवाना होणार असून एचएमटी तांदळाच्या वाणाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. खोब्रागडे यांचे नुकतेच निधन झाले.