नोटाबंदीच्या काळात मोठ्याप्रमाणात बँकेत जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना आता प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले गेले आहेत. अनेकांनी तर दुसऱ्यांचेही पैसे त्या काळात आपल्या खात्यात जमा केले होते. अशांनाही नोटिसा येत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आता विकतचे दुखणे घ्यावे लागले आहे. अशातच आता गुजरातमधील जुनागड शहरात एका चर्मकाराला प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाली आहे. त्याने नोटाबंदीच्या काळात बँक खात्यात १० लाख रूपये केले होते. या १० लाख रूपयांचा स्त्रोत त्याला विचारण्यात आला आहे. परंतु, त्या चर्माकाराने आपण अशाप्रकाराचा कोणताच व्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे.
जुनागड शहरातील एमजी रस्त्यावरील एका कोपऱ्यात मनसुख मकवाना (वय ५५) चर्मकाराचे काम करतात. शनिवारी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर मकवानांना धक्काच बसला. तो ज्या कोपऱ्यात बसून चपला, बूट शिवायचं काम करतो. तिथे येऊन त्याला नोटीस देण्यात आली आहे.
मला धक्का बसला आहे. मी आयुष्यात इतका पैसा कमावलेला नाही. मी मोठ्या कष्टाने दररोज २०० रूपये कमावतो. तेव्हा मी इतकी रक्कम कशी जमा करू शकतो. या नोटिशीमुळे मी घाबरलो आहे. आत्महत्या करण्याचाही मनात विचार येऊन गेल्याचे मकवानाने म्हटले आहे. मकवाना चिंबावाडी गावात राहतो. गेल्या २५ वर्षांपासून तो जुनागड शहरात चप्पल, बूट शिवण्याचे काम करतो. बँक ऑफ बडोदामध्ये आपले जनधन खाते असल्याचे त्यांनी सांगितले.
जुनागडचे भाजपचे आमदार महेंद्र मशरू यांनी मकवाना यांची भेट घेतली. प्राप्तिकर विभागाच्या काही तांत्रिक चुकीमुळे कदाचित नोटीस मिळाली असेल, असे आमदार मशरू म्हणाले. मकवानाच्या बँक खात्यात कोणतेही संशयास्पद व्यवहार नसल्याचे ते म्हणाले. गरज पडल्यास आपण मकवानाबरोबर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटू असे आश्वासनही दिले.
प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर ज्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली. अशा १८ लाख लोकांपैकी निम्म्या लोकांना संशयित श्रेणीत ठेवले आहे. अशांवर ३१ मार्च रोजी उत्पन्न जाहीर करण्याची मुदत संपल्यानंतर कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीच्या काळात बँकेत पाच लाख रूपये किंवा त्याहून अधिक पैसे जमा करणाऱ्या १८ लाख लोकांना ऑपरेशन क्लीन मनीतंर्गत खुलासा देण्याचे आवाहन करण्यात आले होते.