पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या सीमा अबाधित आहेत आणि राहणार असा विश्वास भाजपाध्याक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. चीन आणि भारतीय सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीचा उल्लेख करताना जे पी नड्डा यांनी भारतीय सैन्यांनी चीनला चोख उत्तर दिलं पण दुर्दैवाने आपले तीन जवान शहीद झाले असल्याची माहिती दिली.

“मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात प्रादेशिक अखंडतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. आता आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती असून लष्करदेखील कोणत्याही शत्रूचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारताकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही,” असं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्य समोरासमोर आले. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.