ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी मुलांना शाळेत पाठवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी यासंदर्भात पालकांना आवाहन केलं आहे. कोवीड १९ मुळे जाहीर करण्यात आलेल्या दिर्घकालीन लॉकडाउननंतर आता मुलांना पुन्हा शाळेत पाठवणं खूप गरजेचं आहे. मुलांना शाळेपासून, शिक्षणापासून वंचित ठेवणं हे खतरनाक व्हायरसच्या तुलनेत जास्त नुकसान करणारं ठरु शकतं असं जॉनसन म्हणाले आहेत. देशामध्ये विंटर सेशनमध्ये म्हणजेच हिवाळ्याच्या कालावधीमध्ये सुरु होणारे शाळांच्या दुसऱ्या सत्रांबद्दल विचार विनिमय सुरु असतानाच पंतप्रधांनी असं आवाहन केल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त झालं आङे. स्कॉटलॅण्ड आणि उत्तर आर्यरलॅण्डमधील शाळा सुरु करण्यात येणार असून त्यानंतर पुढील आठवड्यात इंग्लंड आणि वेल्समधील शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेसने दिलं आहे.

जॉनसन यांनी इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि ब्रिटनच्या इतर प्रदेशातील समिक्षकांनी जारी केलेल्या एका संयुक्त पत्रकाचा आधार घेत मुलांना करोना विषाणूचा धोका खूपच कमी असल्याचे अधोरेखित केलं आहे. तसेच मुलांना आणखीन काळ शाळांपासून दूर ठेवल्यास त्यांच्या कौशल्यावर आणि अभ्यासावर वाईट परिणाम होऊ शकतो असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जॉनसन यांनी डाउनिंग स्ट्रीटमधील एका वक्तव्यामध्ये, “मुख्य आरोग्य अधिकारी सांगतात त्याप्रमाणे, शाळांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी आहे. मुलांना जास्त काळ शाळा आणि शिक्षणापासून लांब ठेवणं त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच, कौशल्य आणि आरोग्यासाठी जास्त धोकादायक आहे,” असं म्हटलं आहे. यामधून मुलांना शाळेत न पाठवल्याने निर्माण होणारा परिणाम हा करोना विषाणूच्या परिणामापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे पंतप्रधांनांना सूचित करायचे होते.

करोनावर मात करणाऱ्या जॉनसन यांनी मुलांना शाळेत पाठवणं का महत्वाचं आहे हे सांगताना मुलांनी आता पुन्हा शिकाणं आणि आपल्या मित्रांबरोबर राहणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना शाळेत पाठवणं जास्त फायद्याचं ठरेल. मुलांना शाळेत पाठवल्याने तिथे ते ज्या गोष्टी शिकतात आणि त्या गोष्टींचा त्यांच्यावर जो परिणाम होतो त्यापेक्षा सध्या अधिक महत्वाचे काही नसल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून सर्व शाळा बंद आहेत. मात्र आता पुढील महिन्यामध्ये शाळा सुरु करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता मुलांना शाळेत पाठवणे अधिक सुरक्षित असल्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करण्याचे काम यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात आहे.