घरगुती मदत काम करण्यासाठी अबू धाबीला गेलेल्या बेंगळुरूच्या २७ वर्षीय महिलेवर ४ महिने भयंकर मोठया त्रासाला समोर जावं लागलं. तिच्या मालकाने तिला पुरेसं अन्न न देता दिवसाचं तिच्याकडून दिवसाचे तब्बल २० तास काम करून घेतलं. इतकंच नव्हे तर या कामाचे पैसे देखील दिले नाहीत. या जाचाला कंटाळलेल्या त्या महिलेने अखेर तिच्या मालकाच्या घराच्या खिडकीतून उडी मारून बाहेर पडली आणि त्यानंतर भारतीय दूतावासाकडे जाऊन आश्रय मागितला. आता अखेर शुक्रवारी ती बेंगळुरूला आपल्या घरी पोहोचली.

पैसे न देता दिवसाचे तब्बल २० तास काम करणं, कपडे न बदलण्यास परवानगी न मिळणं असा जाचक अनुभव २७ वर्षीय बेंगळुरू महिलेने अबूधाबीत आपल्या ४ महिन्यांच्या काळात घेतला आहे. त्यातच तिचा पासपोर्ट देखील हिसकावून घेण्यात आला होता. ह्या सगळ्या त्रासाने हैराण झालेल्या या महिलेने अखेर आपल्या मालकाच्या घराच्या खिडकीतून उडी मारली. त्यानंतर ती भारतीय दूतावासात आश्रय मागण्यासाठी गेली. अखेर शुक्रवारी संध्याकाळी ही महिला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) पोहचली. आपल्या घरी परत आल्याचा आनंद आणि दिलासा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.

३०,००० रुपयांच्या मासिक पगारासाठी ‘ती’ अबुधाबीला गेली

निमिषा (बदललं नाव) यांचा जन्म आणि बालपण बेंगळुरूमध्येच गेलं. तिने आपल्या परिसरातील काही घरांत घरकामांत मदत करून आपले वृद्ध पालक आणि तीन लहान भावंड असलेल्या तिच्या कुटुंबाला सांभाळलं, आधार दिला. परंतु करोना संकटाने तिला बेरोजगार केलं. या काळात तिला प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. कुटुंबाला आर्थिक आधार देणं, २ वेळचं जेवण आणि औषधांचा खर्च भागवणं तिच्यासाठी मुश्किल झालं

मग तिला एक व्यक्ती भेटली. गोरिपल्या येथील एक बेकायदेशीर एजंट आयशाने निमिषाला ३०,००० रुपयांच्या मासिक पगारासाठी अबू धाबीमध्ये घरगुती मदत काम करण्याची नोकरी लावण्याचं वचन दिलं. “बेंगळुरूमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जे संघर्ष करत होते त्यांच्यासाठी ही ऑफर खरंच खूप मोठी होती. त्यामुळे निमिषाने देखील ती ऑफर स्वीकारली आणि मार्चच्या अखेरीस ती यूएईमध्ये जाण्यास निघाली. बेंगळुरू केआयएचे पीआयएन नागेंद्र बाबू, ऑफिस ऑफ प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स यांनी ही माहिती दिली.

ना पुरेसं अन्न ना आराम

अबुधाबीमध्ये उतरल्यावर निमिशाला श्रीलंकेचा एजंट असलेल्या अजमलने तिला तिच्या मालकाकडे म्हणजेच एका अमीराती कुटुंबाकडे नेलं. पण इथून पुढे तिच्यासाठी खूप आव्हानं उभी होती. अधिकारी नागेंद्र बाबू म्हणाले की, “ती सकाळी ४ वाजता कामासाठी उठायची. तिला पुरेसं अन्न, पाणी न देणं, कपडे बदलू न देण्यासह अत्यंत कठोर वागणूक दिली गेली. दोन महिन्यांनंतर देखील त्या कुटुंबाने तिला काहीही दिलं नाही.

निमिशाला फोन वापरण्याची देखील परवानगी नव्हती. तिने खूप प्रयत्न करून श्रीलंकेचा एजंट अजमलशी संपर्क साधला. आपली दुर्दशा सांगितली. मात्र, त्याने तिचा पासपोर्ट परत देण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये मागितले. अखेर तिने बंगळुरूला परत येण्याचा निर्धार केला. २५ जुलै २०२१ रोजी आपले मालक झोपलेले असताना निमिशा घराच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारून बाहेर आली. त्यानंतर ती अबूधाबी येथील भारतीय दूतावासाकडे गेली.

अखेर सुखरूप ‘ती’ घरी परतली

अबुधाबी येथील भारतीय दूतावासाने बेंगळुरू येथील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट IFS शुभम सिंग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि निमिषाला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. बऱ्याच दिवसांच्या अनिश्चिततेनंतर, अखेर निमिषा एअर इंडियाच्या विमानाने बंगळुरूत दाखल झाली. तिला पासपोर्ट मिळवता न आल्याने भारतीय दूतावासाने तिला प्रवासासाठी आणीबाणी प्रमाणपत्र दिले. बेंगळुरूला उतरल्यानंतर निमिषा तिला घेण्यासाठी आलेल्या आपल्या भावाला भेटून प्रचंड भावून झाली. “मी इथे परत आले यावर माझा विश्वासच बसत नाही. मला फक्त माझ्या कुटुंबाकडे परत जायचं आहे आणि नव्याने सुरुवात करायची आहे.”

नोकरीचं फसवं आश्वासन देणाऱ्यांपासून राहा सावध!

“परदेशात नोकरी शोधणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाने फक्त नोंदणीकृत एजंटशी संपर्क साधावा. ज्यांची यादी आमच्या पोर्टल emigrate.gov.in वर उपलब्ध आहे. सध्या कर्नाटकात फक्त ३५ असे नोंदणीकृत एजंट आहेत. त्यामुळे, लोकांनी नोकरीचं आश्वासन देणाऱ्या फसव्या लोकांना बळी पडू नये”, असं सिंह म्हणाले.

परदेशातील भरती फसवणुकीशी संबंधित किंवा एजंटची सत्यता पडताळण्यासाठी लोक ०८०-२५७११४९९/५९९ किंवा poebengaluru@mea.gov.in द्वारे परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत स्थलांतरितांच्या संरक्षकांशी संपर्क साधू शकतात आणि याद्वारे एका तासात तुम्हाला प्रतिसाद मिळू शकतो.