News Flash

बोस्टन : दुसऱ्या संशयितास अटक

बोस्टन येथील मॅरेथॉन स्पर्धेत सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दिवसभराच्या धडक शोधमोहिमेनंतर झोखर सारनेव्ह (१९) या दुसऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलीस अखेर यशस्वी ठरले. सारनेव्ह याला पकडल्यानंतर

| April 21, 2013 02:51 am

सारनेव्ह याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी गेल्या २४ तासांच्या कालावधीत संपूर्ण शहराचीच जणू नाकेबंदी केली होती. गेले तीन-चार दिवस शहरास पोलिसांनी वेढा घातल्याचा अनुभव स्थानिक नागरिकांना येत होता. झोखरला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी जाहीर केल्यानंतर शेकडो लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. झोखर याला अटक झाल्यामुळे याप्रकरणी गेले पाच दिवस सुरू असलेले शोधनाटय़ही आता संपुष्टात आले.
सारनेव्ह आणि त्याचा भाऊ तामेरलॅन सारानेव्ह या दोघांना पकडताना पोलिसांनी गोळीबार केला त्यामध्ये तामेरलॅन हा ठार झाला. त्याच वेळी झोखर हाही जखमी झाला, परंतु तो तेथून पळून जाण्यात सफल झाला. नंतर एका बोटीमध्ये दडून बसलेल्या झोखर सारनेव्ह याला कब्जात घेतल्यानंतर पोलिसांनी एकच जल्लोष केला. झोखर याला जखमी अवस्थेत पकडण्यात आले. झोखर हा बोटीमध्ये दडून बसलेला असल्याची माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकाने दिली. झोखर ज्या बोटीमध्ये दडलेला होता, त्या बोटीजवळ मोठय़ा प्रमाणावर रक्त दिसल्यामुळे या नागरिकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना सावध केले. नंतर पोलिसांनी कारवाई करून तातडीने झोखरला रुग्णालयामध्ये हलविले. ‘अखेरीस आरोपीस पकडले, शोधमोहीम संपली असून दहशतवाद संपला आहे आणि न्यायाचा विजय झाला आहे. संशयित आता कोठडीत आहे, असे झोखरला पकडण्यात आल्यानंतर बोस्टनच्या पोलीस विभागाने ट्विटरवरून जाहीर केले.
 झोखर सारनेव्ह याच्याकडे मॅसॅच्युसेट येथील वाहनचालकाचा परवाना आहे. झोखर सारनेव्ह हा कोठेही लपून बसला असेल या संशयामुळे त्याला पकडण्यासाठी बोस्टन शहराच्या वॉटरटाऊन या उपनगरातील एका भागाची पोलिसांनी पूर्णपणे नाकेबंदी केली होती. शहरातील लाखो लोकांनी घराबाहेर न पडण्याचेही आवाहन पोलिसांनी केले होते. झोखरला पकडण्यासाठी निष्णात असे नेमबाजही तैनात करण्यात आले होते. आणखी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्व शाळा आणि विविध विद्यापीठांमधील महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.
 वॉटरटाऊनमधील जनतेने घरातून बाहेर पडू नये आणि गणवेशातील पोलीस असल्याची खात्री केल्याशिवाय घराचा दरवाजा उघडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
ओबामांकडून कौतुक
दरम्यान, दहशतवाद्यांना आपल्या ठिकाणी थारा न दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बोस्टनवासीयांचे कौतुक केले आहे. बोस्टनच्या नागरिकांनी दहशतवाद्यांना आश्रय देण्यास नकार दिल्यामुळेच दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिळाले, असे ओबामा यांनी आकाशवाणीवरील भाषणात नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:51 am

Web Title: boston another suspected arrested
Next Stories
1 बलात्कार, टू जी आणि कोळसा घोटाळ्याचे पडसाद संसदेत उमटणार
2 घृणास्पद प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस कृती करा – सोनिया
3 ‘टू-जी’ बाबतचा अहवाल फेटाळण्याचे भाजपचे आवाहन
Just Now!
X