बोस्टन बॉम्बस्फोटातील संशयित झोखर सारानेव्ह याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे सूत्रांनी सांगितले. झोखरच्या प्रकृतीचा धोका टळला असून तो संभाषणही करू शकतो. त्याच्या चौकशीदरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली असून त्याची प्रकृती झपाटय़ाने सुधारत आहे, असे पीटर किंग या काँग्रेसच्या खासदारांनी सांगितले.
बोस्टन बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित तामेरलॅन हा प्रमुख संशयित असून झोखर हा त्याचा भाऊ आहे. झोखरवर प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मॅरॅथॉन स्फोटानंतर झालेल्या पोलीस गोळीबारात तामेरलॅन ठार झाला होता. पोलिसांनी तामेरलॅन याच्या पत्नीचीही चौकशी केली आहे.
तथापि, तामेरलॅन याला पत्नी आणि एक मूल असून तो एका छोटेखानी घरात राहतो आणि त्याने तेथे स्फोटके एकत्रित ठेवली, अन्य सामुग्री जमविली त्यानंतर तो रशियाला गेला आणि पत्ीनला तेथेच सोडून पुन्हा परतला, याबाबत किंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.