ओदिशाच्या कारपाबाहाल गावात माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. भारताच्या काही भागात लोक अजूनही जाती व्यवस्थेच्या मानसिकतेतून बाहेर पडले नसल्याचे या घटनेतून दिसते. कारपाबहाल गावात राहणाऱ्या १७ वर्षाच्या सरोजला शेजाऱ्यांनी मदत नाकारल्यामुळे सायकलवरुन आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला.

सरोजला त्याच्या शेजाऱ्यांनी मदत नाकारली त्यामागे कारण होते त्याची जात. सरोज आणि त्याची मृत आई कनिष्ठ जातीतील असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याला अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारली. त्यामुळे सरोजला सायकलला बांधून आईचा मृतदेह न्यावा लागला. घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत सायकलवरुन मृतदेह नेल्यानंतर सरोजने जंगलामध्ये मृतदेहाचे दफन केले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे त्याला मृतदेहाचे दफन करावे लागले. सरोजची आई जानकी सिन्हानियाचा पाणी भरताना खाली कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. जानकीचा सुंदरगड येथे राहणाऱ्या माणसाबरोबर १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर जानकी मुलगा आणि मुलीसह कारपाबाहाल गावात राहत होती.