एका १७ वर्षाच्या तरुणाने डबिंग स्टुडिओच्या मालकिणीविरोधात बाल कल्याण समितीकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. चेन्नईच्या वीरगामबाक्कमध्ये हा स्टुडिओ असून तिथे हा मुलगा डबिंग आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करायचा. अकराव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने चाइल्डलाईनला फोन करुन ४५ वर्षीय महिलेवर लैंगिक छळाचा आरोप केला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी महिला आणि तिचा पती वीरगामबाक्कमध्ये डबिंग स्टुडिओ चालवतात. हा मुलगा २४ एप्रिलला बाल कल्याण समितीसमोर हजरही झाला. हा मुलगा गरीब कुटुंबातील असून तीन वर्षांपूर्वी केरळमध्ये एका कार्यक्रमात त्याची या जोडप्याबरोबर ओळख झाली होती. या जोडप्याने स्वेच्छेने या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचण्याची तयारी दाखवली तसेच त्याला राहण्यासाठी आपल्या घरात जागा दिली. स्टुडिओमध्ये काम करत असल्याबद्दल दर महिन्याला या मुलाला स्टायपेड म्हणून काही रक्कम सुद्धा दिली जायची.

स्टुडिओची मालक असलेल्या महिलेने लैंगिक सुखासाठी आपल्याबरोबर शारीरीक जवळीक वाढवायला सुरुवात केली त्यावेळी खरी समस्या सुरु झाली असे या मुलाने सांगितले. जेव्हा मी या संबंधांना विरोध केला तेव्हा तिने मला भरपूर अपशब्द सुनावले. या जोडप्याने माझ्यात कपाटात कंडोम असल्याचे फोटो अन्य डबिंग आर्टिस्टमध्ये पसरवले असा आरोप या मुलाने केला. जेव्हा आपल्याला हा छळ असहय्य झाला तेव्हा मी केरळला फोन करुन माझ्या आईकडे मदत मागितली.

आम्ही हे प्रकरण आता सीबीसाआयडीकडे ट्रान्सफर केले आहे असे बाल कल्याण समितीच्या सदस्य शैला चार्ल्स मोहन यांनी सांगितले. आरोपी महिला दोन मुलांची आई आहे. या जोडप्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या मुलाने आपल्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला. जेव्हा आम्ही या मुलाच्या कपाटाची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये नोटांची बंडले आणि कंडोम सापडले. आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने कोणाचेही नाव उघड केलेले नाही.