हातात बंदूक पकडून जेम्स बाँण्डच्या पोझमध्ये फोटो काढत असताना चुकून बंदुकीतून सुटलेली गोळी लागून चुलत भावाचाच मृत्यू झाला. दिल्लीच्या सरीता विहारमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. ही दोन्ही भावंडे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी त्यांच्या बेडरुममध्ये वेगवेगळया पोझमध्ये फोटो काढत असताना हा अपघात घडला. १७ वर्षीय छोटया भावाने दोन्ही हातात बंदूक पकडून जेम्स बाँण्डसारखी पोझ दिली होती. त्यावेळी मोठा भाऊ समोर उभा राहून ती पोझ मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना अचानक बंदुकीतून सुटलेली गोळी लागून तो खाली कोसळला. ही घटना घडली त्यावेळी मुलाची आई आणि बहिण दोघेही घरी होते.
गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी लगेच बेडरुमच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या मोठया भावाला त्यांनी लगेच जवळच्या अपोलो रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला बाल सृधारगृहात पाठवले असून त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. कारण बंदुकीची मालकी त्यांच्याकडे आहे.
या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मोठया भावानेच छोटया भावाला बाँण्डसारखे कॅमेऱ्याच्या दिशेने बंदूक रोखून उभे राहायला सांगितले होते. बंदुकीचा ट्रिगर दाबल्यास फोटो अधिक खराखुरा वाटेल असे आपल्याला वाटले म्हणून आपण ट्रिगर ओढला असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. ती बंदूक लोड आहे, त्यात गोळया भरलेल्या आहेत याची कल्पनाही त्याला नव्हती. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांनी एकदा कपाट उघडले होते त्यावेळी मुलाने ती बंदूक उचलली होती असे नातेवाईकाने सांगितले. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 2:37 pm