विश्व हिंदू परिषदेने देशातील जनतेला चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देशभरातील जनतेला केले आहे.

चीनने ५० भाविकांना आपल्या हद्दीत प्रवेश नाकारला आहे. प्रवेश नाकारण्यात आलेले भाविक सिक्कीममधील नाथू ला मार्गे कैलास मानसरोवरला जात होते. भाविकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तिबेटवर चीनचा डोळा आहे. चीनने अनधिकृतपणे तिबेट बळकावला आहे,’ असे विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी म्हटले आहे.

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारणाऱ्या चीनच्या विरोधात केंद्र सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. यासोबतच चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आव्हानदेखील देशाच्या जनतेला करण्यात आले आहे. सीमेवरील तणाव वाढल्याने भाविकांना परवानगी नाकारण्यात आल्याचे स्पष्टीकरण चीनकडून देण्यात आले आहे. भारतीय सैन्याने सिक्कीम सीमा ओलांडून घुसखोरी केल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून घुसखोरी केल्याचा आरोप चीनकडून भारतावर करण्यात आला आहे. भारताने सिक्कीममधून लष्कर हटवल्यावरच भाविकांना मानसरोवर यात्रेसाठी परवानगी देण्यात येईल, अशी भूमिका चीनने घेतली आहे. मंगळवारी चीनने बीजिंगमधील भारतीय दुतावासाकडे भारताच्या कथित घुसखोरीचा निषेध नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर असताना हा सर्व प्रकार घडला आहे. सिक्कीम सेक्टरमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये दोन्ही देशांचे जवान अनेकदा आमनेसामने आले आहेत. चिनी सैन्याने या भागातील भारताचे दोन बंकरदेखील नष्ट केले आहेत.