शिलाँग : अमरनाथ यात्रेसह काश्मीरमधून येणाऱ्या वस्तूंच्या खरेदीवरही बहिष्कार टाकण्याच्या आवाहनास मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्व वैधानिक संकेत धुडकावून पाठिंबा दिला आहे.

तथागत रॉय हे उजव्या विचारसरणीचे नेते म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की लष्कराच्या एका निवृत्त कर्नलने  दोन वर्षे काश्मीरला भेट देऊ नका, अमरनाथला जाऊ नका, काश्मिरी व्यापाऱ्यांच्या वस्तू खरेदी करू नका असे आवाहन केले आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

पाकिस्तानी लष्कर काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत असून पूर्व पाकिस्तानात बलात्कार, कत्तली यांसारखे गुन्हे करीत आहे. त्यांनी पूर्व पाकिस्तानात अत्याचार चालवले आहेत. भारताने तसे करावे असे मी म्हणणार नाही, पण ते जसे पूर्व पाकिस्तानबाबत वागतात त्याचप्रकारे आपण काश्मीरपासून अंतर ठेवून वागले पाहिजे.

काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ठार झाले होते त्यानिमित्ताने एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने काश्मिरी वस्तू व अमरनाथ यात्रेवर बहिष्कार टाकण्याच्या केलेल्या आवाहनावर तथागत रॉय यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.