पद्मावत चित्रपट प्रदर्शित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली असली तरी संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राजस्थानसह गुजरातमध्येही चित्रपटावरून वाद वाढताना दिसत आहे. मंगळवारी अहमदाबादमधील मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी राज्यात शांतता राखण्यासाठी लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे अपील केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद सहजासहजी संपणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पटेल म्हणाले की, गुजरात सरकारने राजपूत समाजातील लोकांच्या भावनांचा सन्मान करत चित्रपटावर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यात चित्रपट दाखवण्यास सांगितले आणि त्यामुळे राज्यात तणाव आहे. राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काही चित्रपटगृहांनीही स्वेच्छेने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांना अपील करतो की, त्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकावा.

याचदरम्यान, करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी हेही गुजरातला आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी चित्रपट पाहायला जाणाऱ्यांनाही इशारा दिला. ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांनी रिलिजच्या दहा दिवसानंतर इंटरनेटवर पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकांना आम्ही चित्रपटगृहात हा सिनेमा पाहू देणार नाही. मी सर्वज्ञंना २५ जानेवारीला सहकार्य करण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अहमदाबादमधील सुमारे आठ मल्टिफ्लेक्सनी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचे म्हटले. हिंसेच्या भीतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आंदोलनकर्त्यांनी मॉल्समध्ये तर तोडफोड व जाळपोळ केलीच. शिवाय बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीही त्यांनी पेटवल्या होत्या.