जगभरात करोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. अशात एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टर प्रेयसीला करोना झाल्याच्या संशयातून तिच्या प्रियकराने तिची हत्या केली आहे. इटलीतही करोनाचं थैमान सुरु आहेत. याच देशात एका मेल नर्सने त्याच्या डॉक्टर प्रेयसीची हत्या केली आहे. या डॉक्टरचं नाव लॉरेना असं होतं तर तिच्या प्रियकरांचं नाव अँटोनिओ डी. पेस असं आहे. हे दोघेही सिसिलियन रुग्णालयात काम करत होते.

२८ वर्षीय अँटोनिओ डी. पेस याने त्याच्या डॉक्टर प्रेयसीची करोना झाल्याच्या संशयातून हत्या केली. आपल्या प्रेयसीला करोनाची लागण झाली आहे, ती आपल्यालाही होईल असं पेसला वाटलं त्यातूनच त्याने तिची हत्या केली. Metro.co.uk ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पेसने हत्येनंतर पोलिसांना फोन करुन याबद्दल सांगितले.

सिसिलियन रुग्णालयातही करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. सध्या इटलीतला कठीण काळ आहे. कारण इटलीत करोनामुळे १३ हजार मृत्यू झाले आहेत. अशात प्रियकराने त्याच्या डॉक्टर प्रेयसीची हत्या केली. पेसने स्वतःच्या हाताची नस कापली होती. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पेसला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

माझ्या प्रेयसीमुळे मला करोनाची बाधा झाली म्हणून मी तिची हत्या केली. पोलिसांना मात्र आरोपीने दिलेल्या कबुलीवर संशय आहे. कारण सुरुवातीच्या तपासात पोलिसांना त्याच्या प्रेयसीला करोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस पेसची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान हे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर इटलीत या घटनेबाबत चांगलाच संताप व्यक्त होतो आहे. डॉ. लॉरेनाने काही दिवसांपूर्वी करोनावर उपचार करताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना आदरांजली वाहणारी एक पोस्ट लिहिली होती.