प्रियकराबरोबर वाद झाल्याने एका २५ वर्षीय तरुणीने मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील द ग्रेट इंडियन प्लेस मॉलच्या (टीजीआयपी) तिसऱ्या मजल्यावरून शिवानी नावाच्या मुलीने उडी मारून आत्महत्या केली. तिच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीमध्ये माझा प्रियकर मला भेटत नाही आणि माझे फोन उचलत नाही म्हणून दु:खी असल्याने हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

दिल्लीतील टीजीआयपी मॉलमध्ये शनिवारी भर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवानीने अनेक लोकांच्या समोरच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. तिला तातडीने जवळच्या सेक्टर २७च्या कैलास हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उडी मारण्यापूर्वी शिवानी जवळजवळ तासभर तिसऱ्या मजल्यावरील एस्कीलेटरच्या शिड्यांजवळ बसून होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.. याबद्दल मॉलमधील एस्कीलेटरजवळ तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये, ही तरुणी एस्केलेटरच्या जीन्यांजवळ एका तासाहून अधिक काळ बसून होती. ती सतत तिच्या फोनकडे पाहत होती. मी तेथून निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी एस्केलेटर जवळ धावतो आणि खाली पाहिले तर ती तीच मुलगी असल्याचे समजले, अशी माहिती त्या सुरक्षारक्षाने दिली.

शिवानीला मृत घोषित केल्यानंतर तिच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली असता एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये शिवानीने आत्महत्येचे कारण लिहीले होते अशी माहिती नोएडे सर्कल वनचे पोलिस अधिकारी अनीत कुमार यांनी दिली. ‘माझा प्रियकर मला भेटू इच्छित नाही तसेच तो माझे फोनही उचलत नाही. त्यामुळे मी खूप अपसेट आहे. आणि म्हणून मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे. यासाठी माझ्यावर कोणीही दबाव आणलेला नाही’ असा मजकूर या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गरज पडल्यास संबंधित प्रियकराचीही चौकशी केली जाईल असे कुमार म्हणाले आहे.

मुलीने उडी मारताच मॉलच्या सुरक्षारक्षकांनी पार्किंगमधील आप्तकालीन रुग्णवाहिकेला फोन करुन अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. आणि त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराची स्थानिक पोलिसांनी माहिती दिल्याचे मॉल व्यवस्थापनाने सांगितले. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार शिवानीचे मूळगाव उत्तर प्रदेशमधील काशगंज येथे आहे. ती दिल्लीमधील सेक्टर ४९ मधील बरोला व्हिलेज परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत होती. मागील काही महिन्यांपासून ते नोएडामधील एका खाजगी कंपनीत कामाला होती. याबद्दल बोलताना सेक्टर ३९ पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी अनिल साही यांनी पोलिस सध्या सीसीटीव्हीमधील फुटेजेस तपासत असल्याचे सांगितले. ही तरुणी मॉलमध्ये एकटीच आली होती का? तीला मॉलमध्ये कोणी भेटले होते का याबद्दल आमचा एकीकडे तपास सुरु आहे तर दुसरीकडे आम्ही तिच्या नातेवाईकांना या घटनेसंदर्भात माहिती कळवली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा पोलिसांनी दाखल करुन घेतला नसल्याची माहिती साही यांनी दिली.