देशात एकाबाजूला दलितांविरोधातील हिंसाचाराच्या घटना वाढत असताना हैदराबाद येथील प्रसिद्ध चिलकुर बालाजी मंदिराचे ६० वर्षीय ब्राह्मण पुजारी एस. रंगाराजन यांनी आपल्या कृतीमधून समाजात समानतेचा संदेश दिला आहे. रंगाराजन यांनी अनेक वर्षापूर्वीची मुनी वाहन सेना ही प्रथा पुर्नजिवीत करत एका दलित भक्ताला खांद्यावरुन वाहून मंदिरात नेले. समाजातून जाती व्यवस्थेचे उच्चाटन करुन सामाजिक समानतेचा संदेश देण्याचा त्यामागे उद्देश होता.

मुनी वाहन सेना ही शास्त्रामध्ये सांगितलेली जुनी प्रथा आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात रंगाराजन यांनी मंत्रोच्चाराच्या पठणात २५ वर्षीय दलित भक्त आदित्य पाराश्रीला आपल्या खांद्यावरुन वाहून मंदिरात नेले. हैदराबादमधील ४०० वर्षापूर्वीच्या श्री रंगानाथ स्वामी मंदिरात हा विधी संपन्न झाला.

आता रंगाराजन यांच्या पावलावर पाऊल टाकत अन्य मंदिरांमध्येही असे विधी सुरु झाले आहेत. मागच्याच आठवडयात पाच जुलैला नेल्लोरच्या तालपागिरी श्री रंगानाथ स्वामी मंदिरातील मुख्य पूजाऱ्यांनी थोकाला व्यंकय्या या दलित भक्ताला खांद्यावरुन वाहून मंदिरात नेले. सर्वात आधी २७०० वर्षांपूर्वी मुनी वाहन सेनेचा विधी संपन्न झाला होता. श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या पूजाऱ्याने कावेरी नदीच्या तीरावरुन एका कनिष्ठ जातीतील भक्ताला खाद्यांवरुन वाहून मंदिरात आणले होते. समाजात समानेतचा संदेश देऊन जाती व्यवस्थेचे उच्चाटन करणे हा त्या विधीमागे उद्देश होता.