मागणीसाठी बारा राज्यांतील समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात

सैन्यातील महार, राजपूत, जाट, मराठा रेजिमेंटप्रमाणे ब्राह्मणांसाठी स्वतंत्र रेजिमंट स्थापण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण आरक्षण संघर्ष समितीने केली आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांचे आंदोलन तसेच सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या आरक्षण समीक्षेच्या मागणीनंतर बारा राज्यांतील समर्थकांनी एकजुटीने ब्राह्मण रेजिमेंट स्थापण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. डॉ. भागवत यांनी ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरक्षण धोरणाची समीक्षा करण्याची मागणी करून भाजपला अडचणीत आणले होते. आता ब्राह्मण समुदायदेखील आरक्षण व स्वतंत्र रेजिमेंटसाठी आक्रमक झाल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. ब्राह्मण समुदायाच्या मागणीची दखल घेतल्यास ब्राह्मणेतर समुदायावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती केंद्र सरकारला आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची गुरुवारी भेट घेतली. समितीचे अध्यक्ष पं. हरिराम दीक्षित म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी लष्करातील बाह्मण रेजिमेंट म्हणून ओळखली जाणारी ‘गौड रेजिमेंट’ बंद केली. त्यामुळे शौर्य गाजविण्याची क्षमता असूनही ब्राह्मण युवकांची लष्करात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा संपली. इंग्रजांनी केवळ द्वेषापोटी गौड रेजिमेंट बंद केली होती. ब्राह्मण युवकांची पुन्हा सैन्यात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करण्यासाठी गौड रेजिमेंट सुरू करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली पर्रिकर यांच्याकडे केली. १८५७ च्या इंग्रज सरकारविरोधी स्वातंत्र्यलढय़ात ब्राह्मणांचा मोठा सहभाग होता. या लढय़ाचे नेतृत्व ब्राह्मणांनीच केल्याचा दावा पं. हरिराम दीक्षित यांनी केला. १८५७ नंतर इंग्रजांनी ब्राह्मणांना सैन्य भरतीपासून दूर करण्यास सुरुवात केली असा आरोप त्यांनी केला.

या मागणीसाठी महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशमधील ब्राह्मण आरक्षण समर्थक येत्या २९ नोव्हेंबरला दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहेत.

हरियाणाप्रमाणे देशभरात ब्राह्मणांना आरक्षण हवे
२० टक्के ब्राह्मणांना स्वत:चे घर नाही. आम्हाला जात व धर्माच्या नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण हवे आहे. हरयाणात ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण आहे. त्याप्रमाणे देशभरात ब्राह्मणांना आरक्षण देण्याची मागणी समितीने केली आहे.जाट, गुज्जर, धनगर, पटेल समुदायांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता ब्राह्मण समुदायानेदेखील शक्तिप्रदर्शन करण्याची रणनीती आखली आहे.