आपल्या समाजात ब्राह्मणांचं स्थान सर्वोच्च आहे यामागे त्यांचा मोठा त्याग आणि तपश्चर्या आहे असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अखिल ब्राह्मणसभेला ओम बिर्ला यांची उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत ओम बिर्ला?
“ब्राह्मण समाज हा कायमच सगळ्या समाजाला मार्गदर्शन करत आला आहे. आजच्या घडीलाही एखाद्या गावात जर एक ब्राह्मण कुटुंब वास्तव्यास असेल तर त्याचे स्थान त्या गावातही कायम उच्चच असते. यामागे ब्राह्मण समाजाची त्यागवृत्ती आणि तपश्चर्या आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतल्याने आयुष्य सार्थकी लागते. समाजात तुमचे स्थान कायमच उच्च राहते”

ब्राह्मण समाज हा कायमच समाजाला दिशा दाखवणारा समाज ठरला आहे. ब्राह्मण समाजाने देशालाही नवी दिशा दाखवण्याचं काम केलं आहे असंही ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कोटा या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. आपले म्हणणे ओम बिर्ला यांनी ट्विटही केले आहे. हे ट्विट आता चांगलेच व्हायरल होते आहे. अनेकांनी ओम बिर्ला यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

“आज आपण नवभारत ही संकल्पना समोर आणली आहे. अशामध्ये ब्राह्मण समाजातल्या शिक्षकांनी त्यांचे कठोर परिश्रम, त्याग, समर्पण भाव आणि सेवाभाव यातून देश घडवण्याचं काम केलं आहे. आयुष्यात गुरुचं स्थान सर्वात श्रेष्ठ असतं. गुरुंच्या शिकवणुकीमुळे आणि संस्कारामुळे आपण घडतो. गुरु आपल्याला विचार देऊ शकतात, आदर्श देऊ शकतात, चारित्र्य कसं जपावं याची शिकवण देतात. या शिक्षकांमुळे चांगले वैज्ञानिक, इंजिनिअर, डॉक्टर होतात. गुरुंमुळे आयुष्य जगण्याची उर्जा मिळते ” असंही ओम बिर्ला यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे.