ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र येत्या वीस वर्षांत तरी कुठल्याही शत्रू राष्ट्राच्या सैन्याला भेदता येणार नाही किंबहुना जगातील त्या प्रकारातील अभेद्य असे ते एकमेव क्षेपणास्त्र असावे असा विश्वास ब्राह्मोसचे निर्माते व ब्राह्मोस एरोस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्ले यांनी म्हटले आहे.
ब्राह्मोससारखे दुसरे क्षेपणास्त्र अजून तरी तयार झालेले नाही, येत्या वीस वर्षांत तरी ते शक्य नाही असे मत त्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या समवेत लिहिलेल्या ‘थॉट्स फॉर चेंज- वुई कॅन डू इट’ या पुस्तकात म्हटले आहे. भारताचे भवितव्य अधिक सुरक्षित व उज्ज्वल करणाऱ्या दहा प्रमुख तंत्रज्ञानांमध्ये ब्राह्मोस तंत्रज्ञान एक आहे असे ते म्हणतात. अनेक प्रकारची तंत्रज्ञाने एकमेकांना पूरक अशा पद्धतीने वापरून देशाला पुन्हा प्राचीन वैज्ञानिक वारसा युवकांनी मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी या पुस्तकात केले आहे.
पिल्ले यांनी पीटीआयला सांगितले की, आपल्याकडे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे ही अभिमानाची बाब आहे कारण ते जगातील एकमेव सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते भारत-रशिया मैत्रीचे एक प्रतीक आहे. भारतीय नौदल व भारतीय लष्कर यांना ते वापरासाठी देण्यात आले आहे. भारतीय हवाई दलासाठी त्याच्या चाचण्या सुरू असून लवकरच ते त्यांनाही दिले जाईल.
भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था तसेच रशियाची एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया संस्था यांच्या सहकार्याने ब्राह्मोसची निर्मिती करण्यात आली असून या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० कि.मी. तर वेग २.८ ते ३ मॅक आहे.
ज्या दहा तंत्रज्ञानांचा उल्लेख कलाम व पिल्ले यांनी केला आहे त्यात माहिती तंत्रज्ञान समुच्चय, नॅनोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), संवेदन तंत्रज्ञान (सेन्सर टेक्नॉलॉजी), अंतराळ तंत्रज्ञान, संमीलन तंत्रज्ञान, हरित तंत्रज्ञान, हायपरसॉनिक्स, मटेरियल टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. नॅनो-इन्फो व बायो म्हणजे अब्जांश तंत्रज्ञान-माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान यांच्या समुच्चयातून आपले भवितव्य घडणार आहे असे पिल्ले यांनी सांगितले.
कंपवात (पार्किन्सन) व एपिलेप्सी (फेफरे) यासारख्या रोगांमध्ये औषधे शरीरात सोडण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर परदेशात यशस्वी झाला असून त्याचे इतर अनेक उपयोग आहेत असेही ते म्हणाले.