भारताने आज (सोमवार) ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (डीआरडीओ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून (आयटीआर) मोबाइल लाँचरवरून सकाळी सुमारे १०.४४ वाजता क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी यशस्वी चाचणीनिमित्त ब्राह्मोसचे पथक आणि डीआरडीओचे अभिनंदन केले. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार असल्याचे ट्विट सीतारमन यांनी केले आहे.

भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास़्त्रे ही ब्लॉक-III यंत्रणेने सज्ज आहेत.

भारतीय लष्कराकडून ब्राह्मोसचा जमिनीवरून हल्ला करणाऱ्या श्रेणीचा २००७ पासून वापर केला जातो. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वत: वर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्याचबरोबर शत्रूच्या हवाई रक्षा प्रणालीपासूनही हे सुरक्षित राहू शकेल.