भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची सोमवारी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी ओदिशाच्या चांदीपूर तळावरुन अत्यंत कठोर चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे आयुर्मान वाढवण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) तसेच रशियाच्या एनपीओएमने संयुक्तपणे ब्रह्मोसची निर्मिती केली आहे. अलीकडेच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विमानविरोधी आणि डोंगराळ भागातील लक्ष्यभेद करण्याची चाचणी करण्यात आली होती.

ब्रह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ब्रह्मोस क्षेपणास्त्र किती उपयुक्त ठरु शकते यासाठी आज अत्यंत कठोर चाचणी करण्यात आली. याआधी २१ मे रोजी चांदीपूर तळावरुनच मोबाइल लाँचरवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी सुद्धा आयुर्मान वाढविण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग होती.

ब्रह्मोसचे आयुर्मान आता १० वरुन १५ वर्ष झाले आहे. आयुर्मान वाढवण्यात आलेले ब्रह्मोस हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे. भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात याआधीच ब्रह्मोसचा समावेश करण्यात आला आहे. जमिनीवरुन हल्ला करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आवृत्ती २००७ पासून भारतीय लष्कराकडे आहे. सुखोई या भारताच्या अत्याधुनिक लढाऊ विमानावरुनही ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. मागच्यावर्षी घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढली आहे.