स्त्री व पुरुष यांच्या मेंदूतील जैविक मंडलांची (सर्किट्स)जोडणी वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे पुरुष अनेक कामे एकाच वेळी (मल्टिटास्किंग) करू शकत नाहीत, स्त्रियांची स्मृती जास्त तल्लख असते, त्यांची सामाजिक कौशल्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. या संशोधनात पेनसिल्वानिया विद्यापीठाच्या पेरेलमान स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील रेडिओलॉजी विभागाच्या सहायक प्राध्यापक रागिणी वर्मा यांचा मोठा सहभाग आहे.  
रागिणी वर्मा यांनी सांगितले, की स्त्री व पुरुषांमध्ये मेंदूतील मंडलांची जोडणी म्हणजे कनेक्टोम्स कशा प्रकारची असतात, याचा अभ्यास एवढय़ा विस्तृत प्रमाणात प्रथमच करण्यात आला आहे. वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले, की मेंदूच्या पुढच्या भागापासून मागच्या भागापर्यंतची न्यूरॉनची जोडणी ही मोठी एकाच अर्धगोलार्धात अशा प्रकारे पुढून मागे झालेली असते. याचा अर्थ आकलन व समन्वयीत कृती यासाठी पुरुषाच्या मेंदूतील मंडलांची जोडणी योग्य प्रकारे झालेली असते. स्त्रियांमध्ये ही जोडणी डाव्या व उजव्या अर्धगोलार्धात झालेली असते, त्यामुळे त्यांच्यात आंतरप्रेरणा, विश्लेषणात्मक क्षमता यांच्यातील समन्वय चांगला असतो. स्त्री व पुरुषांच्या मेंदूचे नकाशे खूप फरक दाखवणारे आहेत व पूरकही आहेत. मानवी मेंदूच्या रचनेचा अभ्यास केल्याने काही कामे पुरुष चांगली करतात तर काही कामे स्त्रिया चांगले करतात, हे नेमके कसे घडते यावर प्रकाश पडला आहे, असे वर्मा यांनी सांगितले. त्या दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थिनी होत्या व त्यांनी संगणक दृष्टी व गणित यात डॉक्टरेट केलेली आहे. या अभ्यासात वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी मेंदूतील लिंगविशिष्ट भेदांचे निरीक्षण केले. त्यात आठ ते बावीस वयोगटातील  ५२१ स्त्रिया व ४२८ पुरुष यांच्या मेंदूचा अभ्यास डिफ्युजन टेन्सर इमेजिंग तंत्राने (डीटीआय) करण्यात आला. डीटीआय हे पाण्यावर आधारित प्रतिमा तंत्र असून त्यात मेंदूच्या सर्व भागातील धाग्यांची जोडणी दिसते व संपूर्ण मेंदूची यंत्रणा मानले जाणाऱ्या कनेक्टोमचीही रचनाही दिसून येते. स्त्रियांमध्ये सुप्राटेनटोरियल भागात जोडणी जास्त प्रमाणात दिसून येते व त्यात सेरेब्रम हा भागही समाविष्ट होतो. मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलार्धाच्या दरम्यान असलेला हा सर्वात मोठा भाग असतो. पुरुषांमध्ये प्रत्येक अर्धगोलार्धात मंडलांची जोडणी मोठय़ा प्रमाणात असते. याउलट सेरेबेलम या मेंदूच्या स्नायू नियंत्रण करणाऱ्या भागात पुरुषांच्या मेंदूतील आंतर अर्धगोलार्धातील जोडणी ही जास्त प्रमाणात दिसून येते व स्त्रियांमध्ये मेंदूच्या अर्धगोलार्धातील अंतर्गत जोडणी जास्त प्रमाणात दिसून येते. या जोडण्यातील फरकामुळे पुरुषांमध्ये अधिक समन्वयित कृती करण्याची क्षमता येते. कारण मेंदूच्या पुढच्या भागात होणारी कृती व मागच्या भागात होणारे आकलन यांची जोडणी सेरेबेलम व कॉर्टेक्स यांत्या दरम्यान व्यवस्थित होते असे त्यांचे म्हणणे आहे. ‘प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अ‍ॅकडॅमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. स्त्रियांच्या मेंदूतील मंडलांच्या जोडण्यांमुळे डाव्या मेंदूतील विश्लेषणात्मक व संगती संस्करण हे उजव्या भागातील आंतरप्रेरणात्मक माहितीशी एकात्म होतात. साधारण तेरा वर्षे वयापर्यंत स्त्री व पुरुष यांच्या मेंदूतील मंडलांच्या जोडण्यात फार किरकोळ फरक असतात पण प्रौढावस्थेत म्हणजे १४ ते १७ वयोगटात ते वाढलेले दिसतात. त्यानंतर तो आणखी वाढत जातो असे दिसून आले आहे.
अभ्यासाचे महत्त्व
पुरुष किंवा स्त्रिया विशिष्ट कामेच चांगल्या प्रकारे का करू शकतात याचे कोडे उलगडेल.
त्यांच्या विचारात फरक का असतो हे समजेल. लैंगिकतेशी संबंधित मेंदू विकारांवर नवीन उपचारपद्धती विकसित करता येतील.