करोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच करोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. करोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील १०० हून अधिक प्रयोग शाळांमध्ये संशोधन केलं जात आहे. याचदरम्यान आता करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यावर मात करुन पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनाशी संबंधित वैज्ञानिकांनी करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या मेंदूवर या विषाणूचा खूपच वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आल्याचं म्हटलं आहे. करोना विषाणू रुग्णाच्या मेंदूवर एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम करतो की मेंदूचे वय दहा वर्षांनी वाढते. म्हणजेच मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन तो अपेक्षित वयोमानापेक्षा लवकर अकार्यक्षम होण्याची शक्यता असते.

लंडनमधील इंपीरियल कॉलेजमधील डॉक्टर अॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखाली ८४ हजारहून अधिक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये काही गंभीर प्रकरणांमध्ये करोना विषाणूचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर झाल्याचे दिसून आलं आहे. यामध्ये एखादी गोष्ट समजून घेण्याची आणि काम करण्याची शक्ती आणि क्षमता कमी होते असं या अभ्यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

या अभ्यासामधून करोनाच्या साथीचा मानवाच्या मेंदूवरही मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच अभ्यासामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या लोकांबरोबरच जे यामधून पुर्णपणे बरे झाले आहेत त्यांच्या मेंदूवरही गंभीर परिणाम झाला आहे. करोनाचे एकही लक्षण नसलेल्या मात्र संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचा दावा या अभ्यास करण्यात आला आहे.

कॉग्निटीव्ह टेस्ट पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. करोनामधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची कॉग्निटीव्ह टेस्ट घेण्यात आली आणि त्यामधून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्यात आला. एकाद्या व्यक्तीचा मेंदू किती चांगल्याप्रकारे काम करतो हे तपासण्यासाठी कॉग्निटीव्ह टेस्ट करण्यात येते. यामध्ये लोकांना कोडी घातली जातात. सामान्यपणे अल्जाइमर म्हणजेच विसरभोळेपणाशी संबंधित आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. करोनाचा परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ८४ हजार २८५ जणांचा चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. ग्रेट ब्रिटिश इंटेलिजेंस टेस्ट नावाअंतर्ग घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमधील प्रश्न या रुग्णांना विचारण्यात आले होते. या सर्व उत्तरांचा एकत्रित पणे अभ्यास करुन हा अहवाल मेडरिक्सीव्ह (MedRxiv) या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या मेंदूवर अधिक परिणाम झाल्याचे दिसून आलं आहे. करोना संसर्गानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णामध्ये कग्निटीव्ह डेफिसीट म्हणजेच मेंदूला झालेले नुकसा अधिक आहे, असं संशोधक म्हणतात. मात्र काही तज्ज्ञांनी या संशोधनाकडे अधिक सावधानतेने पाहण्याचे गरज असल्याचे म्हटले आहे. एडिनबर्ग विद्यापिठातील न्यूरोइमेजिंगचे प्राध्यापक असणाऱ्या जोआना वार्डलॉ यांच्या म्हणण्यानुसार करोनाचा संसर्ग होण्याआधीच लोकांमध्ये कॉग्निटीव्ह इपॅक्ट म्हणजेच मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.