पाकिस्तानात २८ वर्ष घालवल्यानंतर ७८ वर्षीय शमसुद्दीन पुन्हा भारतात आपल्या घरी पोहोचले आहेत. शमसुद्दीन आणि कुटुंबीयांची तब्बल २८ वर्षांनी भेट झाल्यानंतर भावना अनावर झाल्या होत्या. शमसुद्दीन यांना भारतीय गुप्तहेर म्हणून अटक करण्यात आली होती. पण नंतर सर्व आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. शमसुद्दीन पुन्हा घरी परतल्यानंतर कुटुंबाने दिवाळीच साजरी केली.

२६ ऑक्टोबरला शमसुद्दीन यांची पाकिस्तान जेलमधून सुटका झाल्यानंतर अमृतसर येथे क्वारंटाइन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलीस सोमवारी शमसुद्दीन यांना कानपूर येथे घेऊन पोहोचले. कुटुंबाकडे सोपवण्याआधी शमसुद्दीन यांना काही प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सर्कल अधिकारी त्रिपुरारी पांडे यांनी दिली आहे. शमसुद्दीन यांना घरी नेलं जात असताना त्यांना पाहून बहिण शबीना बेशुद्ध झाल्या तर त्यांच्या मुलींना अश्रू आवरत नव्हते. शमसुद्दीन यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

“कारागृहात मी खूप काही सहन केलं आहे. माझी सुटका हे दिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट आहे,” अशा भावना शमसुद्दीन यांनी व्यक्त केली आहे. बूट तयार करण्याचा व्यवसाय असणाऱ्या शमसुद्दीन यांनी काही नातेवाईकांसोबत झालेल्या वादानंतर १९९२ मध्ये भारत सोडला होता आणि ९० दिवसांच्या व्हिसावर पाकिस्तानात गेले होते.

काही वेळानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला कानपूरला पाठवत पाकिस्तानातच थांबले होते. २०१२ मध्ये भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली शमसुद्दीन यांना अटक करण्यात आली. यानंतर आठ वर्ष ते पाकिस्तानमधील कारागृहात होते. २६ ऑक्टोबरला त्यांची सुटका करण्यात आली.

अटारी बॉर्डवरुन शमसुद्दीन यांनी भारतात प्रवेश केला. पण करोनामुळे त्यांना १४ दिवस क्वारंटाइन व्हावं लागलं. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस १४ नोव्हेंबरला अमृतसरला पोहोचले आणि त्यांना परत आणून कुटुंबाकडे सोपवलं.

“आपला देश सर्वात्तम आहे. पाकिस्तानात भारतीय निर्वासितांना योग्य वागणूक दिली जात नाही. तिथे जाऊन मी खूप मोठी चूक केली. भारतीयांना ते शत्रूप्रमाणे वागणूक देतात,” असं शमसुद्दीन यांनी म्हटलं आहे.