News Flash

पोलीस आणि CRPF च्या जवानांनी रक्तदान करुन वाचवले नक्षलवादी महिलांचे प्राण

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी केले रक्तदान

नक्षलवादी महिलेसाठी केले रक्तदान

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जखमी झालेल्या एका महिलेचे सीआरपीएफच्या जवानांनी आणि पोलिसांनी प्राण वाचवले. विशेष म्हणजे जखमी महिला ही नक्षलवादी असूनही पोलीस खात्यामधील अधिकाऱ्यांनी रक्तदान करुन तिचे प्राण वाचवले. पोलीस अधीक्षक चंद्रकुमार झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील मुफासील आणि गोलीकेरा पोलिस स्थानकांमधील भागामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली.

संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देताना झा म्हणाले की, ‘नक्षलवाद्यांना समर्पण करण्यास सांगण्यात आले मात्र त्यांनी पोलीस आणि सुरक्षादलाच्या जवानांवर गोळीबार केला. तसेच भूसुरुंगही सक्रिय केले.’ त्यानंतर दोन्ही बाजूने बराच वेळ गोळीबार झाला. अखेर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. सुरक्षादलांनी नंतर त्या परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन केले त्यावेळी त्यांना एक जखमी नक्षलवादी महिला दिसून आली. खूप रक्तस्त्राव झाल्याने ती बेशुद्ध पडली होती. त्या महिलेच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने मोठी जखम झाली होती. तिला जवानांनी आणि पोलिसांनी आधी जवळच्या सोनुवा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले त्यानंतर तिला चैबासा येथील सरदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही योग्य उपचार होऊ न शकल्याने तिला जमशेदपूरमधील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. या महिलेला सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज शर्मा, मुख्य हवलदार बिचित्र कुमार आणि हवलदार बीरबहादूर यादव यांनी रक्त दिले. वेळीच रक्त आणि योग्य उपचार मिळाल्याने या नक्षवादी महिलेचे प्राण वाचले.

याआधीही काही आठवड्यापूर्वी सीआरपीएफच्या जवानांनी सीआरपीएफचे जवान असणाऱ्या राजकमल यांनी रक्तदान करुन एका नक्षवादी महिलेचे प्राण वाचवले होते. पुर्ती या महिलेला गोळी लागल्यानंतर राजकमल यांनी स्वत: रक्त देण्याची तयारी दर्शवली होती. याबद्दल सीआरपीएफने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केलेल्या पोस्टमध्ये, ‘गरज असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला मदत करणे माझे कर्तव्य आहे, असं राजकमल यावेळी म्हणाले होते,’ असं नमूद करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 7:34 pm

Web Title: brave crpf jawans donate blood to save naxal woman injured during encounter in jharkhand
Next Stories
1 RBI Interim Surplus: रिझर्व्ह बँक सरकारला देणार २८ हजार कोटी रूपये
2 आघाडी प्रेमाची; युती मात्र सत्तेसाठीच, सुप्रिया सुळेंचा निशाणा
3 ICJ कोर्टात भारतीय अधिकाऱ्याने कृतीतून पाकिस्तानला दाखवली जागा
Just Now!
X