दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत बळी ठरलेल्या त्या तरुणीची जीवनेच्छा शेवटपर्यंत प्रबळ होती. जेव्हा तिला सफदरजंग रुग्णालयात ठेवले होते तेव्हा तिची आई व भाऊ तिच्याजवळ होते. तेव्हा तिने एका चिठ्ठीवर संदेश लिहिला होता, ‘आई मला जगायचंय..’ पण तिची ही जगण्याची असोशी अखेर संपली.
बलात्काराच्या घटनेनंतर १९ नोव्हेंबरला म्हणजे तीन दिवसांनी तिला तिची आई व भाऊ भेटले. तिच्यावर बलात्कार तर झालाच, पण तिला ज्या क्रूरपणे जखमी केले गेले त्याबाबत डॉक्टरांनीही असे क्रौर्य आम्ही कधी पाहिले नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली होती. तिच्यावर उपचार करणारी परिचारिका तिला पाहून ढसढसा रडायची, इतकी तिची अवस्था वाईट होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिने सतत खाणाखुणांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याबरोबर असलेला तिचा सहकारीही तिला भेटला तेव्हा तिने गुन्हेगार पकडले गेले का, असा प्रश्न विचारला होता. या मित्राची खुशालीही विचारली होती. तिच्या आईवडिलांशी ती बोलत होती. दंडाधिकाऱ्यांपुढे तिने एकदा नव्हे दोनदा जबाब दिला. पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली ही तरुणी स्वप्नाळू होती. दहा दिवसांच्या उपचारात तिने मानसरोगतज्ज्ञांना जे काही सांगितले त्यावरून तिची काही स्वप्ने त्यांना उलगडली.
तिने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांपुढे २१ डिसेंबरला निवेदन केले. घडलेल्या घटनेची बारीकसारीक माहिती, घटनाक्रम तिने सांगितला. तिच्या मित्राने दिलेल्या माहितीशी ते सगळे जुळणारे होते. जेव्हा या निवेदनावरून वाद झाला तेव्हा पुन्हा तिने दंडाधिकाऱ्यांपुढे हकीगत कथन केली. मानसिकदृष्टय़ा ती कणखर होती व भविष्याविषयी आशावादी होती.    

मेंदूला सूज आल्याने मृत्यू
सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा मृत्यू हा तिला काही दिवसांपूर्वी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर मेंदूला आलेल्या सुजेमुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सेरेब्रल एडेमा म्हणजे मेंदूतील पेशी व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जागेत पाणी साठल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. मंगळवारी रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला व त्यामुळे तिच्या मेंदूतही जखमा झाल्या. मेंदूतील गुंतागुंत तसेच बहुअवयव विकलांगता यामुळे तिचा सिंगापूर येथाल माउंट एलिझाबेथ रुग्णालयात मृत्यू झाला.मेदांता मेडिसिटीचे डॉ. यतीन मेहता यांनी सांगितले की, मेंदूतील जखमा हे तिच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण ठरले. सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असतानाच तिला मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे तिच्या मेंदूत जखमा झाल्या व सर्व अवयव निकामी झाले होते.
तिचा रक्तदाब सुरळीत होता व हृदय काल सायंकाळपर्यंत रक्त व्यवस्थित शरीरात सगळीकडे पाठवत होते. तिच्या फुफ्फुसांना काल जंतुसंसर्ग झाला पण तरीही रक्तदाब पुरेशा प्रमाणात होता.दिल्ली ते सिंगापूर या सहा तासांच्या प्रवासाबाबत डॉ. मेहता यांनी सांगितले की, या काळात काही मिनिटांसाठी तिचा रक्तदाब खूप कमी झाला होता, पण तो लगेच पूर्ववत करण्यात आला. नंतर तिने अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद उपचारांना दिला होता. चांगल्या उपचारांसाठी तिला सिंगापूरला हलवण्यात आले. ती जगण्यासाठी शेवटपर्यंत झुंजली. समाज म्हणून आपण अशा गुन्ह्य़ांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. केवळ अश्रू गाळून विसरून जाणे योग्य नाही.      

सेरेब्रल एडेमा म्हणजे काय?
सेरेब्रल एडेमामध्ये मानवी कवटीत पाणी साठते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक द्रव साठल्याने रक्ताचा प्रवाह अडखळतो, परिणामी मेंदूला सूज येते. मेंदूतील पेशी व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जागेत पाणी साठल्याने ही स्थिती निर्माण होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या काळात पीडित तरुणीच्या मेंदूलाही इजा पोचली होती.

मंडवारा कलान गावावर शोककळा
बलिया (उत्तर प्रदेश)दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तिच्या मंडवारा कलान या गावी शोककळा पसरली. गावचे प्रमुख शिवमंदिर सिंग यांनी सांगितले की, या तरुणीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आम्ही प्रार्थना केली. जी घटना घडली त्याबाबत लोकांच्या मनात संतापाची व पश्चात्तापाची भावना असून, हा गुन्हा केलेल्यांना कठोर शिक्षा करावी, अशी त्यांची मागणी आहे.गुन्हेगारांना यापुढे दहशत निर्माण होईल अशी शिक्षा दिली जावी, असे सिंग यांनी म्हटले आहे. या तरुणीच्या एका नातेवाइकाने सांगितले की, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यापासूनच या गावावर अस्वस्थतेचे सावट होते.