काश्मीरमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी दहशतवाद्यांनी आणि फुटिरतावाद्यांनी घातपाताच्या धमक्या दिल्या आहेत. येथे उमेदवारी अर्ज करणाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थालांतरीत झालेल्या दोन काश्मिरी तरुणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील वॉर्डमधून मंगळवारी त्यांनी अर्ज भरला. मात्र, आपल्या अर्जबाबत त्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवाद्यांकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर यांपैकी एका २८ वर्षीय पंडित तरुणाला ही बाब पूर्णपणे गुप्त ठेवायची होती. त्यामुळे अर्ज भरताना तो कॅमेरापासून दूरच होता. त्याचे व्हिडीओ, फोटोज तसेच आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात येणार नाही याची त्याला खात्री दिल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो तातडीने जम्मूकडे रवाना झाला. तो जम्मूचा रहिवासी असून काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा भडका झाल्यानतंर आपल्या कुटुंबासह त्याला ९०च्या दशकात कुलगाममधून जम्मूकडे स्थलांतरीत व्हावे लागले होते. १५ सदस्यांच्या एका छोट्या गटाचा तो सदस्य असून या सदस्यांनी कुलगाम आणि देवसार जिल्ह्यातील २१ वॉर्ड्समध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येथे ८ ते १६ ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होणार आहेत. या गटात कमीतकमी दोन लोक हे स्थलांतरीत पंडित आहेत.
या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर कुलगाममध्ये पूर्णपणे रिकामे राहण्याऐवजी आता एक तृतीयांश वॉर्ड रिकामा राहणार आहे. येथील ७ वॉर्डमध्ये एकानेही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने हे वॉर्ड रिकामे आहेत. तर इतर १५ वॉर्ड्समध्ये बहुतेक उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील अशी स्थिती आहे.

काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान घातपात घडवून आणण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. तसेच फुटिरतावाद्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. तर येथील दोन प्रमुख पक्ष पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) या पक्षांनीही यापूर्वीच या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. त्याचबरोर काँग्रेसनेही म्हटले आहे की, सध्या या निवडणुका घेण्यासाठी येथील वातावरण अनुकूल नाही.

दक्षिण काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू यांनी या निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना नायकूने आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांनाही जीवे मारले जाईल अशी धमकी दिली होती. त्यानुसार, गेल्या शुक्रवारी ३ काश्मीर पोलिसांच्या हत्याही करण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर अनेक काश्मीरी पोलिसांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिल्याचे बोलले जात होते. मात्र, सरकारने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे अशा दहशतीच्या वातावरणात येथे निवडणुका होणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Braving the storm kashmiri pandits file nominations for jk civic polls
First published on: 26-09-2018 at 14:07 IST