अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं. यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ट्रम्प सरकारने चीनलाही इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा >> ट्रम्प यांनी शेवटच्या भाषणात बायडेन यांचा उल्लेख टाळला, पण जाता जाता दिला सूचक इशारा

ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये पोम्पिओ यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे. “ब्रिक्स लक्षात आहे का?,” असा प्रश्न विचारत या ट्विटला पोम्पिओ यांनी सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये पोम्पिओ यांनी ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल.ं

चीनला असाही दणका

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जाता जाता चीनला पुन्हा एक दणका दिलाय. ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनने उइगर मुस्लीमांचा नरसंहार केला आणि हा मानवेविरुद्ध केलेला गुन्हा असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं म्हटलं आहे. झिनजियांगमधील स्वतःचे (चीनचे) धोरण, पद्धती आणि गैरवर्तवणुकीसंदर्भाती विस्तृत माहिती देणारे कागदपत्रांच्या आधारे पोम्पिओ यांनी चीनमध्ये उइगर मुस्लींवर होत असणारा हिंसाचार हा किमान मार्च २०१७ पासून सुरु असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधताना पॅम्पो यांनी ही माहिती दिल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> उइगर मुस्लीमांच्या विषयावरुन ट्रम्प सरकारच्या शेवटच्या दणक्यामुळे चीनवर काय होणार परिणाम

पॅम्पो काय म्हणाले?

“सर्व उपलब्ध माहितींची पडताळी केल्यानंतर मला खात्री आहे की चीनने कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाऱ्या उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला आहे,” असं पॅम्पो यांनी म्हटलं आहे. “माझ्यामते अजूनही हा नरसंहार सुरु असून या माध्यमातून उइगर मुस्लिमांना चीनमधून कायमचं संपवण्याचा चीनचा विचार आहे,” असंही पॅम्पो यांनी नमूद केलं आहे.

 

अनेकदा झालीय चीनवर टीका

शिनजियांगमध्ये सुरु असणाऱ्या सरकार पुरस्कृत हिंसेवरुन अनेकदा चीनवर जागतिक स्तरावर टीका झाली आहे. मात्र चीनने कायमच येथे चालवण्यात येणारे कार्यक्रम हे व्होकेशन ट्रेनिंग सेंटर्स म्हणजेच प्रशिक्षण शिबिरं असल्याचा दावा केला आहे. स्थानिकांना नवीन कला आणि कौशल्य शिकवले जात असल्याचा दावा चीनने केलाय. मात्र अनेक देशांनी या छावण्यांमध्ये उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप केलाय.