ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती केलेल्या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एकीकडे बोल्सोनारो यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसतानाच शिक्षण मंत्र्यांनाच नियुक्तीनंतर काही दिवसात राजीनामा द्यावा लागल्याने बोल्सोनारो आणखीन अडचणीत सापडल्याचे असोसिएट प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात शंका उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

बोल्सोनारो यांनी शिक्षण मंत्रीपदी नियुक्त केलेल्या कार्लोस अॅलबर्टो डिकोटेली हे आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आहेत. मात्र कार्लोस यांनी आपल्या शिक्षणासंदर्भातील खोटी माहिती दिल्याचे आरोप त्यांच्या नियुक्तीनंतर करण्यात आले. त्यानंतर कार्लोस यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त ब्राझीलमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. हा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कार्लोस यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बाल्सोनारो यांनी सोमवारी लिहिलेल्या एका पोस्टमधून त्यांची बाजू घेतली होती. “कार्लोस यांच्यावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन टीका होताना दिसत आहे. यासंदर्भात त्यांनी प्रातिनिधी मंडळाकडे खुलासा केला आहे,” असं बाल्सोनारो यांनी म्हटलं होतं. मंगळवारी बाल्सोनारो यांनी कार्लोस यांच्या खांद्यावर देशाच्या शिक्षण विभागाच्या कारभाराची जबाबदारी टाकण्यात येत असून त्यांच्याकडील पदव्या या ब्राझीलबरोबरच परदेशी विद्यापिठांमधील आहेत, असं स्पष्ट केलं होतं. मात्र कार्लोस यांनी ज्या तीन विद्यापिठांच्या पदव्या असल्याचा दावा केला होता, त्या विद्यापिठांनीच याला नकार दिला.

पदव्यांसंदर्भात विद्यापिठांकडूनच खुलासा

सरकारने जाहीर केलेल्या कार्लोस यांच्या रेझ्युमेनुसार ते संशोधक तसेच प्राध्यापक असल्याचे नमूद करण्यात आलं होतं. मात्र मंगळवारीच गेट्युलीयो वारगॅस फाउण्डेशनने देशाचे भावी शिक्षण मंत्री हे संशोधकही नाहीत आणि प्राध्यापकही नाहीत असं म्हटलं होतं. सरकारने शेअर केलेल्या कार्लोस यांच्या रेझ्युमेवरील माहिती चूकीची असल्याचा दावा फाउण्डेशनने केला होता. कार्लोस यांनी आपल्या रेझ्युमेममध्ये अर्टेंटिनामधील रोसारियो विद्यापिठामधून डॉक्टरेट पदवी घेतल्याचं नमूद केलं होतं. मात्र या विद्यापिठातील अधिकाऱ्यांनी कार्लोस यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्याचे ट्विटवरुन स्पष्ट केलं आहे.

कार्लोस यांनी जर्मनीमधील वुपर्टल विद्यापिठामधून पोस्ट डॉक्टरेट पदवी घेतल्याचा दावा केला होता. मात्र ब्राझीलमधील ग्लोबो टेलिव्हजन नेटवर्कवरील वृत्तानुसार या विद्यापिठानेही कार्लोस यांना अशी कोणताही पदवी प्रदान करण्यात आलेली नसल्याचे पत्रक जारी केल्याचे म्हटले आहे.