जगभरात करोनाचं थैमान सुरूच आहे. भारत, अमेरिकेसह ब्राझीललाही करोनाचा मोठा फटका बसला असून, करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशाचं लक्ष सध्या लशीकडे लागलं आहे. मात्र, करोनाची लस घेण्यास ब्राझीलच्या राष्ट्रपतीनींच नकार दिला आहे. “आपण करोनाची लस घेणार नाही. तो माझा अधिकार आहे,” असं अजब विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी केलं आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बोलसोनारो यांनी यापूर्वीही अनेक वेळा करोनाच्या लसीकरण कार्यक्रमाबद्दल संशय व्यक्त करणारी विधानं केलेली आहेत. बोलसोनारो यांनी गुरुवारी रात्री अनेक सोशल मीडियांवर थेट प्रक्षेपण सुरू असताना हे विधान केलं आहे. रॉयटर्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

“मी तुम्हाला सांगतोय, मी लस घेणार नाहीये. तो माझा अधिकार आहे,” असं जेअर बोलसोनारो यांनी म्हटलं आहे. बोलसोनारो यांनी मास्क वापरण्याच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचे खूप कमी पुरावे आहेत. करोनावरील लस मुबलकप्रमाणात उपलब्ध झाल्यानंतरही मला लशीची गरज पडणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे बोलसोनारो यांना जुलैमध्येच करोना झाला होता.

जगभरात सध्या करोना लस निर्मितीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कंपन्यांना लस निर्मितीत यश आलं असून, अनेक लशींच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, ब्राझीलमध्ये करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. करोनाबाधितांची संख्याही ब्राझीलमध्ये मोठी आहे.