काश्मीरमधील फुक्तल नदीवर बांधलेला मानवनिर्मित तलाव गुरुवारी फुटल्याने कारगिल जिल्ह्य़ात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील सहा पूल वाहून गेले असून, प्रभावित गावांमध्ये मदतकार्य सुरू केले आहे.
तलाव झन्स्कार भागात आहे. गुरुवारी सकाळी ८.१० वाजता जोराचा आवाज झाला व पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने शेजारील गावात घुसला. जवळपास दोन ते तीन हजार नागरिक पुरात अडकले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. हा भाग दुर्गम असून,  नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. या भागामध्ये प्रसिद्ध चदर ट्रेक असून जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण राहिले आहे. निमो-बाझ्गो जलविद्युत प्रकल्पही याच नदीवर असून लेह जिल्ह्य़ाला फुक्तल नदीतूनच पाण्याचा पुरवठा केला जातो.